तुर्कीयेमधील भूकंपामध्ये कोसळलेल्या इमारतींचे बांधकाम निकृष्ट !

  • ११३ बांधकाम व्यावसायिकांची चौकशी

  • अनेकांना अटक करण्याचा आदेश

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेमधील भूकंपामध्ये आतापर्यंत ३४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या ५० सहस्र इतकी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या भूकंपामध्ये ६ सहस्रांहून अधिक इमारत कोसळल्या आहेत, तर अनेक इमारती चांगल्याही स्थितीत आहेत. याचा अर्थ काही इमारतींचे बांधकाम निकृष्ट असल्याने त्या कोसळल्या. यामुळेच आता येथील ११३ बांधकाम व्यावसायिकांची चौकशी चालू करण्यात आली आहे. तसेच काही जणांना अटक करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

१. तुर्कीयेच्या भूकंपाचे तेथील तज्ञांकडून विश्लेषण केले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इमारत बांधण्याविषयीचे धोरण कठोर नसणे आणि आधुनिक तंत्रज्ञान लागू न करणे यांमुळेच इमारती कोसळल्या आणि अधिक मृत्यू झाले.

२. चौकशीत असेही समोर येत आहे की, बांधकाम क्षेत्राच्या व्यवसायामध्ये तेजी असल्याने कायद्यांकडे दुर्लक्ष केले गेले. भूविज्ञान आणि अभियांत्रिकी तज्ञ या संदर्भात चेतावणी देत असतांनाही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.

संपादकीय भूमिका 

भारतातही मोठ्या तीव्रतेचा भूकंप आला, तर निकृष्ट आणि कायदा धाब्यावर बसवून बांधलेल्या इमारती पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने आता यातून बोध घेत सर्वच इमारतींच्या बांधकामांची चौकशी करून कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत !