मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानासाठी आम्ही १०० वेळा क्षमा मागतो ! – मौलाना महमूद मदनी

डावीकडून मौलाना महमूद मदनी आणि मौलाना अर्शद मदनी

नवी देहली – संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले. १२ फेब्रुवारी या दिवशी देहलीच्या रामलीला मैदानावरील सद्भावना संमेलनात ‘दारुल देवबंद उलूम’चे प्रमुख आणि जमियतचे नेते मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला’ आणि ‘ॐ’ एकच असल्याचे विधान केले होते. त्या वेळी मंचावर उपस्थित जैन मुनी लोकेश हे त्याला विरोध करत अन्य धर्मीय संतांसह मंचावरून पायउतार झाले होते. त्यावर मौलाना महमूद मदनी यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले. मौलाना अर्शद मदनी हे मौलाना महमूद मदनी यांचे काका आहेत.

महमूद मदनी पुढे म्हणाले की, प्रत्येक जण त्यांची मते मांडतो. सर्वांना मर्यादेमध्ये मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. आचार्य लोकेश यांनी या स्वातंत्र्याचा अपलाभ घेतला. त्यांना मंचावर आधी बोलण्याची संधी मिळाली होती. नंतर ही त्यांनी त्यांचा आक्षेप नोंदवला. त्यांच्या आक्षेपावरही अनेकांना आक्षेप आहे. आचार्यांविषयी आमच्या मनात सन्मान आहे. ते आमच्याशी पूर्वीपासून जोडलेले आहेत. जगात भारताखेरीज असा कोणताही देश नाही, जेथे वेगवेगळ्या धर्माचे, वेशभूषेचे, भाषेचे लोक एकत्र रहातात.

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ वेगवेगळे ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – ‘ॐ’ आणि ‘अल्ला’ वेगवेगळे आहेत. मौलाना अर्शद मदनी यांचे विधान चुकीचे आहे. यामुळे आपसांत वाद निर्माण होईल. मुसलमान अल्लाला मानतात, तर हिंदु ॐ ला, असे मत समाजवादी पक्षाचे येथील खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी व्यक्त केले.