प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे : मुंबईत ‘चतुरंग प्रतिष्ठान’ नावाची एक संस्था आहे. ती प्रति मासाला (दर महिन्याला) एखादे नामवंत लेखक, कवी, नट-नट्या किंवा कलाकार यांचा सत्कार करत असे. संस्थेचे अर्ध्वयु श्री. रमेश महाजन हे माझे शाळेतील वर्गमित्र होते. मी संमोहन उपचारशास्त्रात प्राविण्य मिळवणारा भारतातील पहिलाच डॉक्टर असल्याने श्री. महाजन यांनी मी कलाकार नसूनही एका मासात (महिन्यात) चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने माझा सत्कार केला होता.

१०० वा कार्यक्रम हा ‘शेवटचा कार्यक्रम’ असे संस्थेने ठरवले होते. १०० व्या कार्यक्रमात आतापर्यंत झालेल्या ९९ कार्यक्रमांत सत्कार झालेल्यांचे एक स्नेहसंमेलन योजले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या सत्कारमूर्तींपैकी कुणालाही ठाऊक नसलेला मीच होतो. प्रत्येक सत्कारमूर्तीने तीन मिनिटांत काहीतरी सांगायचे होते. माझ्याआधी बोलणारे नामवंत लेखक, कवी, नट-नट्या किंवा कलाकार यांचे बोलण्यासाठी नाव पुकारले गेल्यावर पुष्कळ टाळ्या वाजवल्या जात होत्या. माझे नाव पुकारल्यावर थोड्या टाळ्या वाजवल्या गेल्या; कारण मला कुणीच ओळखत नव्हते. त्या वेळी बोलतांना मी म्हणालो, ‘‘येथे उपस्थित असलेले नामवंत लेखक आणि कवी गोष्टी, कविता, नाटके, तसेच सिनेमाच्या पटकथा लिहितात. त्यांत बहुदा प्रेम करणारे नायक-नायिका असतात. नाटक आणि सिनेमे यांत नट-नट्या हिरो-हिरॉईनच्या भूमिका पार पाडतात. वाचक किंवा प्रेक्षक नायक-नायिका आणि हिरो-हिरॉईन यांच्या भूमिकेत स्वतःला पहायला लागतात आणि तात्कालिक सुख अनुभवतात. पुढे नायक-नायिका आणि हिरो-हिरॉईन यांच्याप्रमाणे त्यांचे मीलन न झाल्याने त्यांना तीव्र निराशा येते. तेव्हा ते उपचारासाठी माझ्याकडे येतात. उपचाराने त्यांचे व्यक्तीमत्त्व सुदृढ झाल्याने त्यांना कायमचे सुख मिळते.’’

एवढे बोलून मी माईक (ध्वनीक्षेपक) बाजूला ठेवल्यावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. कडकडाटाला व्यासपिठावरील सर्व मान्यवरांनीही उस्फूर्तपणे दाद दिली.’

– डॉ. आठवले (५.११.१९८९)