रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात येणार्या चारचाकीचा आणि पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातानंतर उपचार चालू असतांना वारीशे यांचा मृत्यू झाला. ‘सकाळी एखादा पत्रकार ज्याच्या विरोधातील बातमीची ‘पोस्ट’ (लिखाण) प्रसारित करतो, त्याच्याच गाडीला धडक बसून त्याचा मृत्यू होतो’, असे झाल्याने हे प्रकरण संशयास्पद झाले. ६ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजता पत्रकार वारीशे यांनी ‘रिफायनरी ग्रुप’ या व्हॉट्सअॅपच्या गटामध्ये ‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फलकांवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींची छायाचित्रे’, या बातमीच्या कात्रणाची ‘पोस्ट’ प्रसारित केली. हा फलक रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेला होता. यानंतर दुपारी १.१५ वाजता आंबेरकर यांच्या गाडीला धडकून वारीशे यांच्या दुचाकीचा अपघात झाला. आंबेरकर हे ‘रिफायनरी समर्थन समिती’चे अध्यक्ष आहेत. ‘या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली, तसेच ‘हत्येचा गुन्हा नोंद न झाल्यास संपूर्ण राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील’, अशी चेतावणी दिली. ‘पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत’, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मुंबईतील पत्रकार संघटनांनी याविरोधात आवाज उठवून निषेध नोंदवला आहे आणि आंबेरकर यांना ‘मकोका’ लावण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आता आरंभी भा.दं.वि. कलम ३०८, नंतर दबाव वाढल्यावर ३०४ हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याशी संबंधित आणि अधिक चौकशीनंतर ३०२ हे फाशीच्या शिक्षेशी संबंधित कलम लावण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी होऊन कदाचित् काही वर्षांनी आरोपीला शिक्षाही होईलही; पण अर्थात्च पत्रकाराचा जीव काही परत येणार नाही. वर्ष २०११ मध्ये छोटा राजन याच्या विरोधात लिखाण करत असल्याने नवी मुंबईतील पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या करण्यात आली होती. वारीशे यांच्या घटनेनंतर ज्योतिर्मय यांच्या हत्येची आठवण झाल्याविना रहात नाही. ८ वर्षांनंतर यातील आरोपींना शिक्षा झाली; परंतु त्यामुळे पत्रकारांवरील दहशत संपली, असे होत नाही. एखाद्या साध्या पत्रकाराला भ्रष्टाचाराविषयी काहीतरी लिखाण छापायचे असेल, तरी त्याच्या डोक्यावर टांगती तलवार रहाते. त्याला त्याच्या कुटुंबियांची काळजी रहाते. अशा घटनांमुळे ‘पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून त्यांना उद़्ध्वस्त करता येऊ शकते’, असा संदेश जातो. ‘महानगर टाइम्स’ या दैनिकाचे वारीशे हे लढाऊ पत्रकार म्हणून ओळखले जात होते. नाणार प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी लिखाण केले होते. त्यांच्या दैनिकात तेथील यात्रेच्या निमित्ताने लावलेल्या फलकाविषयी त्यांनी दिलेल्या बातमीचीच ‘पोस्ट’ केली होती. आंबेरकर हे नाणार प्रकल्प ज्या भूमीत होऊ शकतो, तेथील भूमींचे व्यवहार करणारे एक होते आणि त्यांच्या गाडीवर ‘रिफायनरी समर्थक’ असे लिहिले होते.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची दुर्दशा !
वारीशे यांची पार्श्वभूमी काय आहे ? किंवा त्यांनी जे लिहिले किंवा ‘पोस्ट’ केले त्यात किती तथ्य आहे किंवा नाही ? ही सूत्रे वेगळी रहातील; परंतु त्यासाठी ‘कायदा हातात घेऊन पत्रकाराची हत्या करणे’, हे त्यावरील उत्तर कधीही असू शकत नाही. असे होण्यास हा देश म्हणजे काही तालिबान नाही. वारीशे यांच्या हत्येच्या घटनेमुळे पत्रकार विश्वात काय वातावरण निर्माण होऊ शकते ? ‘संबंधित परिसरात ज्याचे वर्चस्व आहे, त्याच्या विरोधात कुणी काही लिहिले, तर त्याची अशी गत होईल’, असे यामुळे कुणालाही वाटेल. अशा घटनेमुळे या परिसरातील अन्य पत्रकार कुठलेही लिखाण करतांना १०० वेळा विचार करतील. त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात लिखाण करतांना त्या परिसरात निर्माण झालेली दहशत कायम राहील. या घटनेच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांचे बोकाळलेले प्रस्थ, त्याचे वर्चस्व आणि त्यामुळे होऊ शकणारे परिणाम या गोष्टी समोर आल्या आहेत. विरोधी पक्ष या घटनेचा वेगळा लाभ उठवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यांचा नाणार प्रकल्पाला विरोध असेल, तेही या घटनेवरून कदाचित् पुढे त्यांची पोळी भाजून घेतील; परंतु वैचारिक विरोध कितीही असला, तरी अशा प्रकारे एखाद्या पत्रकाराची हत्या होणे, हे काही निकोप समाजाचे लक्षण नाही. मुंबईतील ‘नायगाव पत्रकार संघा’ने काळ्या फीती लावून या घटनेचा निषेध केला आहे, तसेच शिरोळ येथील पत्रकार संघानेही निषेध केला आहे. हा निषेध आता वाढत जाईल.
प्रलंबित सूत्रांचे समाजावरील दुष्परिणाम
सध्याच्या काळात बहुतांश पत्रकार हे पैसे घेऊन लिहीत असल्याचे कटु वास्तव समोर येते. त्याच वेळी नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेकांचे हितसंबंध गुंतल्याचेही समोर येते. इथे कुणी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ राहिलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. एखादा प्रकल्प देशात योग्य आहे किंवा नाही, याचा नीट निर्णय न झाल्यामुळे, तसेच सरकारला त्याविषयी जनतेला पटवून न देता आल्यामुळे गोष्टी कुठल्या थराला गेल्या आहेत, याचे हे उदाहरण आहे. यामुळे आतापर्यंत झालेली किंवा होणारी निसर्गाची हानी हा एक भाग राहील; पण ‘या प्रकल्पाच्या लढ्यात जीवही गेले’, याची नोंद इतिहासात होईल. एखाद्या गोष्टीवर जनतेचे एकमत नसेल, तर त्या वादाचे समाजावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचे हे उदाहरण आहे. जनतेतील असंतोष दूर करण्यास सरकार यशस्वी झाले नाही का ? असाही प्रश्न या निमित्ताने भविष्यात उभा राहील. या घटनेवरून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे समाजाची विरोध पचवण्याची शक्ती न्यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते. सीमावादासह अनेक सूत्रे आज राज्यात आणि देशात प्रलंबित असून त्यांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या पत्रकारावरील आक्रमण, हे निकोप समाजाचे लक्षण नव्हे ! |