ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

ज्येष्ठ निरुपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर

मुंबई – ज्‍येष्‍ठ निरुपणकार पद्मश्री आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाकडून ‘महाराष्‍ट्र भूषण’ हा राज्‍याचा सर्वोच्‍च पुरस्‍कार घोषित करण्‍यात आला आहे. आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या अध्‍यात्‍म, समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयी उल्लेखनीय कार्याविषयी त्‍यांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात येणार आहे.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.

पद्मश्री आप्‍पासाहेब धर्माधिकारी दासबोध आणि श्री सद़्‍गुरु चरित्र यांच्‍या माध्‍यमातून समाज घडवण्‍याचे कार्य करत आहेत. वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्‍याकडून अध्‍यात्‍मप्रसार आणि सामाजिक कार्य यांचा वसा आप्‍पासाहेब चालवत आहेत. वर्ष २००८ मध्‍ये तत्‍कालीन शासनाने नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍काराने गौरवले होते. या वेळी खारघर येथे ४० लाखांहून अधिक भाविक उपस्‍थित होते. या गर्दीच्‍या उच्‍चांकाची वर्ष २०१० मध्‍ये ‘लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्‍ये नोंद झाली आहे. मागील ८० वर्षे या घराण्‍याकडून अध्‍यात्‍म आणि समाजकार्य यांची सांगड घालून लोकोत्तर कार्य चालू आहे. वृक्षारोपण आणि त्‍यांचे संवर्धन, रक्‍तदान शिबिरे, स्‍वच्‍छता अभियान, विहिरींतील गाळ काढणे आदी विविध समाजकार्य आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली चालू आहे.