म्हसवड (जिल्हा सातारा), ८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. बाजार पटांगण येथील भाजी मंडईच्या प्रांगणातून सकाळी १० वाजता मोर्च्याला प्रारंभ झाला. एस्.टी. बसस्थानक चौक, पंढरपूर नाका, छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरून मोर्चा म्हसवड नगर परिषद कार्यालयासमोरील शामियानात पोचला. या वेळी भाजपचे आमदार जयकुमार गोरे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, श्री. रत्नदीप शेटे, कु. सृष्टी पोळ, सौ. मेघा माने, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मोर्च्याला संबोधित केले. या मोर्चात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्या संख्येने भगवे झेंडे, टोपी घालून सहभागी झाले होते. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची वेशभूषा परिधान केलेली लहान मुले घोड्यावर, रथामध्ये विराजमान झाली होती.
या वेळी भाजपचे श्री. विक्रम पावसकर यांनी ‘हिंदु समाजाने धर्मरक्षणाचे कार्य हाती घेत हिंदु म्हणून जगले पाहिजे’, असे आवाहन करत हिंदु बांधवांचे प्रबोधन केले. समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी, गोवंश हत्याबंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. हिंदुत्वनिष्ठ सौ. मेघा माने यांनी मुसलमान आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मांतरासाठी विविध आमिषे दाखवून, फसवून, तसेच बळजोरीने हिंदूंचे धर्मांतर करत आहे. हिंदु युवतींनीसुद्धा धर्मांधांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता रणरागिणी बनून सामना करावा, असे आवाहन केले.