जालना – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणार्यास १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.
‘शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मोगल शासक होते; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते’, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्याच्या निषेधार्थ ५ फेब्रुवारी या दिवशी जळगाव, नांदेड आणि जालना येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे फलक जाळण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. या वेळी जालना येथे कपिल दहेकर यांनी वरील घोषणा केली.
नांदेड येथे भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध !
नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले आणि भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निषेध व्यक्त करून छायाचित्रास जोडे मारून आंदोलन करण्यात आले. नांदेड शहर भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने हडको येथे ५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजता निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित क्षमा मागावी ! – विक्रांत पाटील, सरचिटणीस, भाजप
भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत. जितेंद्र आव्हाडसारखी औरंगजेब आणि शाहिस्तेखान यांची पिलावळ जर महाराजांचा अवमान करणार असेल, तर भाजप हे मुळीच खपवून घेणार नाही. आव्हाड जाणीवपूर्वक वारंवार ठरवून अवमान करत आहेत, हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे. ते शिवप्रेमींच्या भावनांचा अंत पहात आहेत. त्यांनी त्वरित क्षमा मागावी, अन्यथा युवा मोर्चाच्या वतीने राज्यात आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करण्यात येईल. आव्हाड यांनी अशी नालायक वक्तव्ये त्वरित थांबवली नाहीत, तर औरंगजेबाच्या या पिलावळीला भाजप युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’’
‘भारतीय जनता युवा मोर्चा मिरज’च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध !
मिरज – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘अफझलखान आहेत-शाहिस्तेखान आहेत; म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत’, असे वक्तव्य केले होते. याचा भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या फलकावर शाई ओतून निषेध व्यक्त केला. या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर वनखंडे, जिल्हा सरचिटणीस दिगंबर जाधव, तालुकाअध्यक्ष राज कबाडे, तालुका उपाध्यक्ष सुमेध ठाणेदार, उमेश हारगे, अवधूत जाधव, बंडा काका कुलकर्णी, विशाल सूर्यवंशी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची दुटप्पी भूमिका ! – समरजितसिंह घाटगे, भाजप
आमदार हसन मुश्रीफ यांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची दुटप्पी भूमिका म्हणजे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून!
राज्यपालांच्या वक्तव्यावेळी, देशद्रोही नवाब मलिकांची बाजू घेताना त्यांनी जी तत्परता दाखवली होती तशी तत्परता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर का दाखवत नाही? pic.twitter.com/4SNoHmA8JX— Raje Samarjeetsinh Ghatge (@ghatge_raje) February 5, 2023
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दुटप्पी भूमिका घेत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याच्या वेळी, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची बाजू घेतांना जी तत्परता दाखवली होती, तशी तत्परता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर का दाखवली नाही ? असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ‘ट्वीट’द्वारे केला.