साधिकेने आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी प्रसाद पाठवणे

‘घरी जाण्‍यापूर्वी माझे दुखणे वाढले होते. त्‍यामुळे ‘तुला जेवढी जमेल, तेवढीच सेवा कर’, असे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला आवर्जून सांगितले. घरी गेल्‍यावर त्‍यांनी मला प्रसाद पाठवला.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसाद पाठवणे आणि साधकाकडे विचारपूस करणे

मी घरी असतांना गोव्‍याहून कोल्‍हापूरला येणार्‍या साधकांच्‍या समवेत परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्‍यासाठी प्रसाद पाठवला. त्‍यानंतर एका साधकाकडून मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा निरोप आला, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लागवडीविषयीच्‍या लेखामधील तुझे छायाचित्र पाहून त्‍यांनी तुझी आठवण काढली आणि ‘तू कशी आहेस ?’, अशी माझी विचारपूस केली.’ त्‍या वेळी मी आश्रमात परत जाण्‍याचे नियोजन करत होते. त्‍यांनी माझी आठवण काढल्‍याचे कळल्‍यावर माझी भावजागृती झाली.

३. रामनाथी आश्रमात गेल्‍यावर गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन होणे आणि त्‍यांनी प्रसाद देणे

गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन झाल्‍यावर मला आनंद झाला. त्‍यांना पाहून मी हात जोडले. तेवढ्यात त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘अरे वा ! मेघाचे दर्शन झाले.’’ त्‍यावर मी त्‍यांना म्‍हणाले, ‘‘नाही, नाही मलाच आज गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी तुमचे दर्शन झाले.’’ जवळजवळ ४ मासांनी मी त्‍यांना पहात होते. ‘वास्‍तविक प्रतिदिन त्‍यांची आठवण येत असल्‍याने मी त्‍यांच्‍यापासून दूर होते’, असे मला कधी वाटत नव्‍हते. गुरुपौर्णिमेच्‍या रात्री श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी त्‍यांचा अमूल्‍य वेळ देऊन माझी सर्व विचारपूस केली. त्‍यांनी मला प्रसाद दिला.

४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसाद पाठवून विचारपूस करणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीही मी घरून परत आले; म्‍हणून माझ्‍यासाठी प्रसाद पाठवला आणि माझी विचारपूस केली. काही दिवसांनी मी पूर्वीप्रमाणे नियमित सेवा करू लागले. तेव्‍हा मी आजारातून बरी झाले; म्‍हणून त्‍यांनी मला पुन्‍हा प्रसाद दिला.

५. कृतज्ञता

‘मी तर काहीच केले नाही, तरीही देव किती देत आहे !’, असे माझ्‍या पुनःपुन्‍हा मनाला वाटत होते. तेव्‍हा मी विचार करायचे, ‘मी जे करत नाही, माझ्‍याकडून जे होत नाही, ते होण्‍यासाठीच देव मला प्रसादाच्‍या माध्‍यमातून आध्‍यात्मिक ऊर्जा देत आहे.’ आपल्‍याला बरे वाटून आपण सेवा करू शकत आहोत, हीसुद्धा देवाचीच कृपा आहे. ‘आपण स्‍वतःचा जेवढा विचार करतो, त्‍यापेक्षा कितीतरी पटींनी गुरु आपला विचार करतात !’, हे मला वरील प्रसंगातून देवाने निदर्शनास आणून दिले. यासाठी मी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. त्‍या कृतज्ञतेसाठी माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत.’

– कु. मेघा चव्‍हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२)