साधिकेला झालेले विविध शारीरिक त्रास, तिने केलेले विविध उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर तिला झालेले लाभ !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणार्‍या कु. मेघा चव्‍हाण यांना कंबरदुखीचा त्रास चालू झाल्‍यावर त्‍यांना झालेले अन्‍य त्रास, त्‍यावर त्‍यांनी केलेले उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आध्‍यात्मिक स्‍तरावरील सांगितलेले उपाय केल्‍यावर त्‍यांना झालेले लाभ येथे पाहूया.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
कु. मेघा चव्हाण

१. कंबरदुखीचा त्रास चालू झाल्‍यावर औषधोपचार चालू करणे

‘जानेवारी २०२१ मध्‍ये मला कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. हा त्रास हळूहळू वाढत जाऊन मला अधिक वेळ बसणे असह्य होऊ लागले. माझ्‍या पायांतही वेदना होत होत्‍या. वैद्यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार मी विविध उपचार चालू केले. आधी वेदनाशामक गोळ्‍या घेतल्‍या. नंतर मी ‘न्‍यूरोथेरपी’चे काही उपचार घेतले; पण अपेक्षित परिणाम होत नव्‍हता. मला ५ -१० मिनिटे बसणेही कठीण होत होते. त्‍यामुळे मार्च मासात वैद्यांनी मला अस्‍थिरोगतज्ञांकडे जाऊन तपासण्‍यास सांगितले.

२. कमरेच्‍या चौथ्‍या आणि पाचव्‍या क्रमांकाच्‍या मणक्‍यांतील अंतर न्‍यून झाल्‍याने पायालाही वेदना होत असल्‍याचे अस्‍थिरोगतज्ञांनी सांगणे

अस्‍थिरोगतज्ञांनी मला तपासल्‍यावर सांगितले, ‘‘तुमच्‍या कमरेच्‍या चौथ्‍या आणि पाचव्‍या क्रमांकाच्‍या मणक्‍यांतील अंतर (गॅप) न्‍यून झाले आहे, तसेच डाव्‍या पायातील शक्‍ती न्‍यून झाली आहे.’’ त्‍याचा ‘एक्‍स रे’ काढल्‍यावर त्‍यांनी मला त्‍याविषयी नेमकेपणाने समजावून सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘मणक्‍यांतील अंतर न्‍यून झाल्‍याने दोन मणक्‍यांतील गादी (‘डिस्‍क’) दबली जाऊन तेथून पायाकडे जाणारी शीर (नस) दबली आहे आणि त्‍यामुळे पायाकडेही वेदना जाणवतात.’’

३. वैद्यांनी मला १५ दिवस पूर्ण विश्रांती (बेडरेस्‍ट) घेण्‍यास सांगितली, तसेच अ‍ॅलोपॅथीच्‍या गोळ्‍या आणि इंजेक्‍शन घेण्‍यास सांगितले. 

४. आयुर्वेदीय उपचारांनी बरे वाटणे

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

त्रासांमुळे मला झोपून रहाण्‍याविना पर्याय नव्‍हता. या कालावधीत घरून आई-वडिलांनी विश्रांतीसाठी, तसेच आयुर्वेदीय उपचारांसाठी घरी येण्‍याचा आग्रह केल्‍याने मी घरी गेले. मी आयुर्वेदाचे उपचार घेतल्‍याने मला बरे वाटले आणि एक घंटा बसणे जमू लागले.

५. दैनंदिन कृती चालू केल्‍यावर दोन्‍ही पायांतील वेदना वाढणे आणि अकस्‍मात् त्रास वाढल्‍यावर वैद्यांनी औषधे घेण्‍यास सांगणे

त्‍यानंतर मी हळूहळू काही दैनंदिन कृती चालू केल्‍या आणि माझे दुखणे पुन्‍हा वाढले. वैद्यांनी मला सांगितले, ‘‘उपचारांनी प्रकृतीत फरक पडला, म्‍हणजे ‘पूर्ण बरे झाले’, असे नसते. न्‍यूनतम ६ मास काळजी घ्‍यायला हवी. काम करणे लगेच चालू करू नये.’’

मला आधी केवळ डाव्‍या पायात वेदना होत होत्‍या. नंतर उजव्‍या पायातही वेदना चालू झाल्‍या. तीव्र वेदनेमुळे मला पाय हलवताही येत नव्‍हता. रात्री झोपल्‍यावर मला माझा पाय बधीर जाणवू लागला. पायात मुंग्‍या येऊन तो जड झाला होता. त्‍यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी जागचे हलणे कठीण होऊन बसले. वेदना असह्य झाल्‍यामुळे मी वैद्यांना कळवले. त्‍यांनी सांगितले, ‘‘तुम्‍हाला एक औषध सांगतो, ते तुम्‍ही लवकरात लवकर मागवून घेऊ शकता.’’ मी ते औषध साधकांच्‍या साहाय्‍याने मागवून घेतले.

६. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्‍याप्रमाणे नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍वरित बरे वाटणे

मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना उपाय विचारले. सद़्‍गुरु काकांनी अर्धा घंटा भ्रमणभाष चालू ठेवून माझ्‍यासाठी नामजपादी उपाय केले. अर्ध्‍या घंट्याने माझा पाय हलका झाल्‍याचे मला जाणवले. नंतर त्‍यांनी मला वेदना असलेली स्‍थाने सांगितली. त्‍यांनी मला त्‍या ठिकाणी मुद्रा करत जप करायला सांगितले. सद़्‍गुरु काकांच्‍या कृपेने अर्ध्‍या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्‍हणजे आपत्‍काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.

७. त्‍यानंतर मी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येऊन औषधोपचार घेतले. या कालावधीत मला ६० टक्‍के फरक पडला होता.

८. भाववृद्धी सत्‍संगासाठी वातानुकूलित थंड हवेत बसल्‍याने दुखणे वाढणे आणि औषधोपचार अन् नामजपादी उपाय चालू ठेवणे

पुढे भाववृद्धी सत्‍संग चालू झाले. तेव्‍हा या सत्‍संगाच्‍या सेवेसाठी मला साधारण ५ – ६ घंटे सलग बसावे लागे. पहिल्‍या सत्‍संगात तेथील वातानुकूलित थंड हवेत (ए.सी्. मध्‍ये) बसल्‍याने माझा त्रास आणखी वाढला. दुसर्‍या दिवसापर्यंत त्रास एवढा वाढला की, मला उठता येत नव्‍हते. मला झोपून रहावे लागले. यासाठी मी उपचारांसह सद़्‍गुरु गाडगीळकाकांना पुन्‍हा नामजपादी उपाय विचारून ते करणे चालू ठेवले.

९. संतांच्‍या कृपेमुळे सत्‍संगात अधिक वेळ बसता येणे

आरंभीच्‍या काही सत्‍संगांत मला २ घंट्यांनंतर थोड्या वेदना जाणवत असत. शक्‍य असेल, तर उठता येत असे किंवा सत्‍संग तसाच पुढे चालू ठेवण्‍याविना पर्याय नसे. सत्‍संगात असेेपर्यंत माझे वेदनांकडे लक्ष जात नसे. क्‍वचित् एखादा सत्‍संग अधिक वेळ लांबला, तर शेवटी वेदना जाणवायची, तसेच कधी वेदना जाणवल्‍यास मी संतांच्‍या चरणांकडे पहायचे. मला त्‍यांच्‍या चरणातून आध्‍यात्मिक ऊर्जा मिळत असे. केवळ त्‍या संतांच्‍या कृपेमुळेच मी सलग सत्‍संगाला बसून सेवा करू शकले.

मी माझे साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत. मी न्‍यून पडते. ‘देवा, ‘तूच या अज्ञानी जिवाकडून तुला अपेक्षित अशी साधना करवून घे’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मेघा चव्‍हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२)