संभाजीनगर – जिल्ह्यातील चित्तेगाव येथील स्त्री रुग्णालयात महिलांचे अवैधरित्या गर्भपात चालू असल्याचे ‘रॅकेट’ उघड झाले आहे. आधुनिक वैद्य अमोल जाधव आणि त्यांची पत्नी आधुनिक वैद्या सोनाली जाधव यांनी एका महिलेचा २ फेब्रुवारी या दिवशी गर्भपात केला होता; मात्र शस्त्रक्रिया करतांना महिलेची प्रकृती बिघडली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव चालू झाला. त्यामुळे आधुनिक वैद्य अमोल जाधव यांनी महिलेला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेले; पण प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेला शासकीय (घाटी) रुग्णालयात भरती करून आधुनिक वैद्य अमोल जाधव पत्नीसह पसार झाले आहेत. रुग्णालयाने सर्व प्रकार पोलिसांना कळवला आहे.
आधुनिक वैद्य अमोल जाधव आणि आधुनिक वैद्या सोनाली जाधव गेल्या ३-४ वर्षांपासून चित्तेगाव येथील पांगरा रोडवर स्त्री रुग्णालयाच्या नावाने रुग्णालय चालवत होते. याच रुग्णालयात ते गर्भपातही करायचे. गेल्या ३ वर्षांपासून हा प्रकार चालू होता; मात्र याची माहिती कुणाला लागली नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही महिला बुलढाणा जिल्ह्यातील आहे. महिलेचा गर्भ बाहेर आल्याचे आणि गर्भपिशवी फाटल्याचे घाटी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करत महिलेचा जीव वाचवला. आरोग्य विभागाने ४ फेब्रुवारी या दिवशी विलंबाने चित्तेगाव येथील स्त्री रुग्णालयावर धाड टाकली. त्या वेळी या ठिकाणी निर्बंध असलेली औषधी आणि गर्भपातासाठीचे साहित्य आढळून आले आहे.
संपादकीय भूमिकाअवैध गर्भपात करण्यावर बंदी असतांनाही आधुनिक वैद्यांनी रुग्णांच्या जिवाशी खेळणे संतापजनक आहे. अशा आधुनिक वैद्यांना आणि त्यांना असे करायला सांगणार्या रुग्णांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! |