खेळाडू विद्यार्थिनींसमवेत प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन !

  • गोंडवाना (अमरावती) आणि मुंबई येथील विद्यापिठांतील प्रकार ! 

  • खेळाडू विद्यार्थिनींची कारवाईची मागणी ! 

गडचिरोली – चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापिठाच्या वतीने गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसमवेत प्रशिक्षक राजेश हजारे आणि व्यवस्थापक विजय सोनकुवर यांनी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्याकडे ३० जानेवारी या दिवशी तक्रार देत कारवाईची मागणी केली. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई होईल’, असे आश्‍वासन विद्यापिठाच्या प्र-कुलगुरूंनी दिले.

१. विद्यापिठाकडून २५ जानेवारी या दिवशी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी १० विद्यार्थिनींचा चमू पाठवण्यात आला होता.

२. प्रशिक्षक राजेश हजारे आणि व्यवस्थापक विजय सोनकुवर यांनी मुंबई विद्यापिठात ‘चार्जर’ मागण्याच्या बहाण्याने मुलींच्या खोलीत जाऊन गैरवर्तन केले. हे दोघे पूर्णवेळ मद्याच्या नशेत असल्याने मुली भयभीत असायच्या.

३. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी तात्काळ प्र-कुलगुरूंना वरील प्रकार सांगितला. संबंधित प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तक्रार केल्यास खेळाडूंना ‘बघून घेऊ’, अशी धमकी देत असल्याचे समजते. (धमकी देणारे असे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना कारागृहात पाठवा ! – संपादक)

४. महिला खेळाडूंसह महिला कर्मचारी तैनात करणे आवश्यक होते; मात्र क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांनीही तसे केले नाही. (स्वतः महिला असूनही ही गोष्ट लक्षात कशी आली नाही ? अशांवरही प्रशासनाने कारवाई करायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे. असे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक हे विद्यापिठासाठी कलंकच !