धर्मांतर रोखण्यासाठी आयोजित गोद्री (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या कुंभाचा समारोप !
जळगाव – हीनानि गुणानी दूषयति इति हिंदु: । म्हणजेच जो हीन अशा गुणांचा नाश करतो, तो हिंदु. हीन म्हणजे काय, तर जो धर्म आणि कुलाचार यांचे पालन करत नाही, अधर्माने वागतो, तो हीन. गाय, ॐकार मूलमंत्र, पुनर्जन्मावर विश्वास असणारा, आई-वडिलांची देवता मानून सेवा करणारा, वेद, शास्त्र, गुरुपरंपरा यांचे पालन करणारा जो कुणी असेल, तो खरा हिंदु ! धर्मपरिवर्तन करणार्यांनी ‘धर्म सोडून जाणार्या धर्माचे दोष कोणते ? ज्या धर्मात जाणार, त्या धर्माचे गुण कोणते ?’, याचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करायला हवा, असे मार्गदर्शन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी केले. ते गोद्री येथील महाकुंभाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘अखिल भारतीय हिंदु गोरबंजारा लबाना नायकडा समाजा’चे संघटन आणि समाजाला पुढील दिशा देणे यांसाठी महाकुंभ पार पडला. या कुंभास अनेक संत-महात्मे उपस्थित होते. यात विविध मान्यवरांची मांदियाळी पहायला मिळाली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु स्वामी रामदेवबाबा, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, तसेच जिल्ह्याचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आदींचा यात समावेश आहे.
या वेळी मंचावर पू. बाबूसिंह महाराज ,पू. गोपाल चैतन्य महाराज, पू. सुरेशजी महाराज, पू. गोवर्धन महाराज, पू. विष्णु महाराज, पू. विश्वेश्वरानंद महाराज, पू. महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, पू. राघवानंद महाराज, पू. महामंडलेशवर विश्वेश्वरानंद महाराज, संत हिम्मत महाराज, जितेंद्र महाराज, श्याम चैतन्यजी महाराज, तसेच मा. शरदराव ढोले, मा. शाम हरकरे, डॉ. गणेश राठोड, संत सिद्धेश्वरीदीदी, डॉ. रणजित सिंह नाईक (गुजरात) आदी उपस्थित होते.
‘बंजारा की बेटी मै सेवालाल की हूँ ।’ या गीताने व्यासपिठावरील मान्यवरांचे स्वागत झाले. तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांतूनही अनेक समाजबांधव या वेळी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अनेक स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांनी गोद्री कुंभ येथे जाण्या-येण्यासाठी विनामूल्य वाहने उपलब्ध करून दिली.
२. संबंधित समाजातील महिला आणि पुरुष यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
३. कुंभाच्या यशस्वी आयोजनानिमित्त ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन आणि श्याम चैतन्य महाराज यांचा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रामदेवबाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
४. शीख समाजाच्या वतीने लंगर सेवा आणि बालाजी देवस्थानच्या वतीने प्रसाद सेवा दिली गेली.
बंजारा समाजाचे आत्मबळ हिमालयाप्रमाणे ! – योगगुरु स्वामी रामदेव बाबाहिंदु धर्म सहिष्णू आहे. त्यामुळे येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. अन्य धर्मीय गरीब लोकांना प्रलोभने दाखवून धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सर्वांनी प्रतिज्ञा घेऊ की, आम्ही यापुढे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. जे बांधव धर्मांतरित झाले आहेत, त्यांची घरवापसी करू. बंजारा समाजाचे आत्मबळ हे हिमालयाप्रमाणे महान आहे. |