नियम धाब्यावर बसवणार्‍या मद्यालयांवर कारवाई करा ! – बीड जिल्हाधिकारी

बीड – देशी आणि विदेशी मद्याच्या दुकानदारांना अनुमती देतांना नियम धाब्यावर बसवणार्‍या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली होती. डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांना आंदोलनाची चेतावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर बीड येथील जिल्हाधिकार्‍यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या मद्याच्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना दिले आहेत. (मद्यविक्री करणार्‍या दुकानदारांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत, हे जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात का आले नाही ? ढिसाळ कारभार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) 

मद्यालयांना अनुमती देतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात येणार्‍या विविध अटी आणि नियम यांचे पालन करणे बंधनकारक असते; मात्र बीड शहरात हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याचे चित्र आहे. बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नियमांचे पालन न करणार्‍या मद्य दुकानांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मद्य दुकानांसाठी अनुमती देतांना ते ठिकाण लोकवस्ती, मंदिर, शाळा, धार्मिक स्थळे यांपासून दूर आहे ना ? याची पहाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होत नाही. याचा समाजमनावर विपरित परिणाम होत आहे, असे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.