भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

जयशंकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळी केले वक्तव्य  

एस्. जयशंकर

पुणे – भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी आहेत. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण ! श्री हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले. जयशंकर यांनी लिहिलेले ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अ‍ॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन २८ जानेवारी या दिवशी करण्यात आले.  ‘भारत मार्ग’ असे या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचे नाव आहे.  त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जयशंकर यांनी मुत्सद्दीपणाची व्याख्या सांगतांना महाभारत आणि रामायण यांचे महत्त्व सांगितले.

जयशंकर पुढे म्हणाले की, ‘श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ?’, ते शिकवले. श्रीकृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध क्षमा केले; परंतु त्यानंतर त्याचा वध केला. कौरव आणि पांडव यांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथ यांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिले, तर त्यांच्या महानतेची प्रचीती येते. ‘हनुमानाला कोणते कार्य दिले होते ?’, ‘ते कार्य हनुमानाने कसे पूर्ण केले ?’,  स्वत:च्या बुद्धीमत्तेचा परिचय देत ते एवढ्या पुढे गेले की, त्यांनी कार्य तर पूर्ण केलेच; परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकाही भस्मसात केली.