हिंगोली येथे शेतकर्‍यांकडून रस्‍त्‍यावर दूध ओतून संताप व्‍यक्‍त !

पीक विमा न मिळाल्‍याच्‍या निषेधाचे प्रकरण

हिंगोली – पीक विमा न मिळाल्‍याच्‍या निषेधार्थ जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांनी चालू केलेले आमरण उपोषण सहाव्‍या दिवशीही चालूच होते. या काळात केलेली आंदोलने आणि शेतकर्‍यांकडून चालू असलेल्‍या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षित नोंद घेतली जात नसल्‍याने शेतकरी संतप्‍त झाले आहेत. गेल्‍या ५ दिवसांपासून उपोषण करत असलेल्‍या उपोषणकर्त्‍यांची प्रकृती ढासळत असल्‍याने आक्रमक शेतकर्‍यांनी २३ जानेवारी या दिवशी रस्‍त्‍यावर दूध ओतून संताप व्‍यक्‍त केला आहे.

जिल्‍ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्‍यापासून वंचित राहिले आहेत. गेल्‍या वर्षीही विमा आस्‍थापनाने कोट्यवधी रुपये शेतकर्‍यांचे थकवले होते, तर प्रीमियमपेक्षाही अल्‍प रक्‍कम शेतकर्‍यांच्‍या बँक खात्‍यात जमा झाली आहे. त्‍यामुळे या विरोधात शेतकर्‍यांकडून आंदोलन केले जात आहे, तसेच लेखी आश्‍वासन देऊनही पीक विमा मिळाला नसल्‍याने शेतकर्‍यांसह शेतकरी संघटनांनी १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्‍पर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे.