आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथे धर्मांतर घडवणार्‍या गुन्‍हेगाराला पाठीशी घालण्‍यासाठी ख्रिस्‍ती समाजाचा मोर्चा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली – सांगली शहरात ख्रिस्‍ती समाजाने नुकताच मोर्चा काढला. यात मोर्चेकर्‍यांनी हिंदु संघटना आणि हिंदु नेते यांच्‍यावर आरोप केले. वास्‍तविक महाराष्‍ट्रात एकाही चर्चवर आक्रमण झालेले नसतांना, असे खोटे आरोप चुकीचे आहेत. आटपाडी येथे हिंदु समाजाच्‍या मोर्च्‍यात अवैध चर्च पाडण्‍याची मागणी करण्‍यात आली; कारण त्‍या ठिकाणी ख्रिस्‍ती समाजाची वस्‍ती नाही. त्‍यामुळे आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथील धर्मांतर घडवणार्‍या गुन्‍हेगाराला पाठीशी घालण्‍यासाठीच ख्रिस्‍ती समाजाचा मोर्चा होता, असा आरोप माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

श्री. नितीन शिंदे पुढे म्‍हणाले, ‘‘सांगलीतील शांतीनगर येथे हिंदु मातंग समाजाची फसवणूक करून, हिंदु धर्माविषयी अपप्रचार करून धर्मांतर करण्‍यात आले आहे. सध्‍या महाराष्‍ट्रात धर्मांतरबंदी कायदा करण्‍यात यावा, यासाठी प्रत्‍येक शहरामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे भव्‍य मोर्चे निघत असल्‍यामुळे धर्मांतरबंदी कायदा झाल्‍यास या तथाकथित नेत्‍यांची दुकानदारी बंद पडेल. या भीतीनेच या नेत्‍यांनी स्‍वार्थासाठी हा मोर्चा काढला होता.’’

या प्रसंगी हिंदु मातंग समाजाचे नेते श्री. अभिमन्‍यू भोसले म्‍हणाले, ‘‘ख्रिस्‍ती समाजातील काही मंडळी हिंदु मातंग समाजातील कुटुंबामध्‍ये जाऊन त्‍यांची सेवा करणे, त्‍यांच्‍यासाठी प्रार्थना म्‍हणणे असे करून त्‍यांचा विश्‍वास संपादन करत आहेत. यानंतर ते हिंदु देवतांची पूजा बंद करण्‍यास प्रवृत्त करत आहेत. याचसमवेत आर्थिक आमीष दाखवून ख्रिस्‍ती धर्मात त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचे प्रकार चालू आहेत. त्‍यासाठी शासनाने कायदा करणे अत्‍यावश्‍यक आहे.’’

या वेळी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ कार्यवाह श्री. नितीन देशमाने, श्री. राजू शिंदे, भाजपचे सरचिटणीस श्री. अविनाश मोहिते, श्री. विकास आवळे, बजरंग दलाचे श्री. आकाश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांसह ओबीसी मोर्चा, हिंदु मातंग समाज, हिंदु एकता आंदोलन, हिंदु मातंग समाज बचाओ समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.