रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील आरतीच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

१. श्रीरामाची (पहिली) आरती चालू होताच भाव जागृत होणे आणि नंतरच्‍या आरत्‍या म्‍हणत असतांना भाव अधिकाधिक जागृत होऊन स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव न्‍यून होत जाणे

कु. राजश्री सखदेव

श्रीरामाची आरती चालू झाल्‍यावर माझा भाव जागृत झाला. नंतर हनुमान, श्री दुर्गादेवी आणि श्रीकृष्‍ण यांची आरती म्‍हणतांना ‘त्‍या आरत्‍या कधी म्‍हणून झाल्‍या’, हे मला समजलेही नाही. ‘प्रत्‍येक आरती अल्‍प वेळेत म्‍हणून होत आहे’, असे मला वाटत होते. प्रत्‍येक आरती म्‍हणत असतांना माझा भाव जागृत होण्‍याचे प्रमाणही पुष्‍कळ होते. आरत्‍या म्‍हणत असतांना मला स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव न्‍यून होत गेली.

२. श्री गुरूंची आरती म्‍हणत असतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसणे

२ अ. श्री गुरूंची आरती चालू होताच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसणे, त्‍यांचे रूप विशाल होत जाऊन डोळ्‍यांत मावेनासे होणे आणि त्‍यांच्‍या उजव्‍या चरणांच्‍या अंगठ्याखाली अनेक साधक मुंग्‍यांप्रमाणे दिसणे : श्री गुरूंची आरती म्‍हणणे चालू झाल्‍यावर मला डोळ्‍यांसमोर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसले. ‘मी त्‍यांचीच आरती करत आहे’, असे मला एक सेकंद वाटले. नंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप विशाल होत जाऊन त्‍यांचे रूप माझ्‍या डोळ्‍यांत मावेनासे झाले. नंतर मला केवळ त्‍यांच्‍या उजव्‍या चरणांच्‍या अंगठ्याचा काही भाग दिसू लागला. त्‍यांच्‍या अंगठ्याखाली अनेक साधक अगदी मुंग्‍यांसारखे दिसत होते.

२ आ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपातून त्‍यांची अनेक रूपे निर्माण होऊन ती वरच्‍या दिशेने जात आहेत’, असे दिसणे : त्‍यानंतर ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या त्‍या रूपातून त्‍यांची अनेक रूपे निर्माण झाली. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रत्‍येक रूप मोठे-मोठे होत वरच्‍या दिशेने जात होते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अशी अनेक रूपे वरच्‍या दिशेने जात आहेत’, असे मला दिसले.

२ इ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ॐकाराप्रमाणे दिसणे आणि ते दृश्‍य पाहून डोळ्‍यांतून भावाश्रू ओघळणे : त्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जे रूप (म्‍हणजे त्‍यांच्‍या उजव्‍या चरणांचा अंगठा) माझ्‍या डोळ्‍यांसमोर दिसत होते, ते मला ॐकाराप्रमाणे दिसू लागले. तो ॐकार तेजस्‍वी होता; पण शीतलही होता. तो पहाताच माझा भाव आणखी जागृत झाला. त्‍या वेळी मला माझ्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव नव्‍हती. थोड्या वेळाने माझ्‍या लक्षात आले, ‘माझ्‍या गालांवरून भावाश्रू ओघळत आहेत.’

३. एरव्‍ही आरत्‍या २५ मिनिटांतच म्‍हणून होत असतांना ‘या वेळी केवळ २ – ३ मिनिटांतच आरत्‍या म्‍हणून झाल्‍या’, असे जाणवणे

आरती झाल्‍यानंतर जयघोष आणि प्रार्थना करतांना मला माझ्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव होऊ लागली. ५ देवतांच्‍या आरत्‍या म्‍हणणे आणि नंतर प्रार्थना करणे, याला अनुमाने २५ मिनिटे लागतात; पण या वेळी २ – ३ मिनिटांतच आरत्‍या म्‍हणून झाल्‍या’, असे मला जाणवले.

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक