रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करणार्‍या साधकांना आश्रमातील संत आणि साधक यांच्‍यावर ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ उपचार करण्‍याची संधी मिळते. त्‍यामुळे ‘या साधकांवर देवाची विशेष कृपा आहे’, असे मला वाटते. उपचार करणार्‍या साधकांना ही सेवा ईश्‍वरचरणी समर्पित करता येण्‍यासाठी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने विविध माध्‍यमांतून नवनवीन सूत्रे शिकायला मिळाली. त्‍यांनीच आम्‍हा साधकांत पालट घडवून आणले.

कु. रोशेल नाथन

१. ईश्‍वराने इतर संत आणि साधक यांच्‍या माध्‍यमातून शिकवणे

मला उपचारांसाठी आलेले संत आणि साधक यांचा नेहमी सहवास मिळतो. त्‍या वेळी संतांचे आचरण आणि बोलणे यांतून मला पुढील दोन सूत्रे प्रकर्षाने शिकायला मिळाली.

१ अ. सातत्‍याने इतरांचा विचार करणारे संत ! : संत या सेवेतील उपचारकर्ते साधक, स्‍वतःच्‍या सेवेशी संबंधित साधक अथवा सहवासात आलेले इतर साधक वा संत यांचा सातत्‍याने विचार करतात.

१ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित असे आचरण करणारे संत ! : संत प्रत्‍येक कृती करण्‍यापूर्वी ‘त्‍या प्रसंगात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना काय अपेक्षित आहे ?’, असा विचार करतात.

१ इ. साधकांनी आलेल्‍या विविध अनुभूती आणि भावक्षण सांगणे : साधकांवर उपचार करत असतांना ते साधकही स्‍वतःच्‍या साधनाप्रवासात आलेल्‍या विविध अनुभूती आणि भावक्षण सांगून इतर साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रेही सांगतात.

२. सेवेच्‍या माध्‍यमातून देव व्‍यापक बनवत असल्‍याचे संतांनी सांगणे

अशाच एका प्रसंगी एक संत मला म्‍हणाल्‍या, ‘‘या सेवेमुळे आश्रमातील साधक, तसेच इतर जिल्‍हे आणि शहर यांतील अनेक साधकांशी तुमचा संपर्क येतो. या सेवेच्‍या माध्‍यमातून देव तुम्‍हाला व्‍यापक बनवत आहे.’’

३. सेवा करतांना जाणवलेले पालट

अ. पूर्वी मला साधकांवर उपचार करण्‍यापेक्षा संतांवर उपचार करण्‍याची सेवा करतांना अधिक आनंद मिळत असे; मात्र आता मला साधक आणि संत यांच्‍यावर उपचार करण्‍याच्‍या सेवेत सारखाच आनंद मिळतो.

आ. पूर्वी मला संतांवर उपचार करायला मिळाले की, ‘माझी साधना चांगली चालू आहे’, असे वाटत असे; पण परात्‍पर गुरुदेव आणि संत यांच्‍या मार्गदर्शनामुळे मला जाणीव झाली की, ‘कोणतीही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण केल्‍यासच ती गुरूंच्‍या पावन चरणी अर्पण होते.

इ. साधकांची सेवा करतांना माझ्‍या मनात ‘हे साधक गुरुदेवांना प्रिय आहेत. त्‍यामुळे यांची सेवा भावपूर्ण केल्‍यास ती सेवा गुरुदेवांच्‍या पावन चरणी पोचेल’, असे विचार येतात.

हे पालट घडून येण्‍यासाठी मी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत; उलट हे पालट म्‍हणजे गुरुमाऊलींनी मला दिलेली भेटच आहे. गुरुदेवांची कृपा आणि शिकवण, तसेच संतांचे आशीर्वाद अन् संकल्‍प यांमुळे माझ्‍यात हे पालट सहजपणे घडून आले.

४. शारीरिक श्रम करण्‍याची क्षमता मर्यादित असल्‍याने ‘प्रत्‍यक्ष धन्‍वन्‍तरि देवताच उपचार करत आहे’, असे वाटणे

लहानपणापासूनच मला शारीरिक श्रम करण्‍याची फारशी सवय नव्‍हती. घरी असतांना अल्‍पशा शारीरिक श्रमानंतरही मला पुष्‍कळ दमायला होत असे. आश्रमातही सकाळी कोणतीही श्रमाची सेवा अथवा उपचार केल्‍यावर मी थकते; मात्र हा थकवा घरी असतांनाच्‍या तुलनेत आश्रमात अत्‍यंत अल्‍प असतो. या सेवा मी परिपूर्ण पद्धतीने पूर्ण करू शकते. माझी शारीरिक क्षमता मर्यादित आहे. त्‍यामुळे जर मी साधना करत नसते किंवा आश्रमात नसते, तर मी इतरांसाठी हे उपचार करूच शकले नसते. त्‍यामुळे ‘साधकांवर मी उपचार करत नसून प्रत्‍यक्ष धन्‍वन्‍तरि देवताच ते करत आहे’, असे मला वाटते.

‘ही सेवा म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेला कृपाप्रसादच आहे’, असे मला वाटते; कारण या सेवेच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी आम्‍हा सर्व साधकांमध्‍ये पालट घडवून आणले आहेत. मला ही सेवा दिल्‍याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. रोशेल नाथन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१२.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक