प्रमाणपत्रांची पडताळणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्‍यात येणार ! – रणजितसिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्‍ट्र शासन

बोगस क्रीडा प्रमाणपत्रे रोखण्‍यासाठी सरकारकडून उपाययोजना !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

रणजितसिंह देओल

मुंबई – क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने करण्‍याचा प्रस्‍ताव आम्‍ही शासनाकडे दिला आहे. प्रमाणपत्रांची ‘ऑनलाईन’ पडताळणी झाल्‍यास बोगस क्रीडा प्रमाणपत्राचे प्रकार रोखता येतील, अशी माहिती क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला दिली.

१. राज्‍यात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. क्रीडा विभागाकडून आतापर्यंत ८०० बोगस क्रीडा प्रमाणपत्रे रहित केली.

२. बोगस क्रीडा प्रमाणपत्रे देऊन सरकारच्‍या विविध १७ विभागांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या ९२ जणांना क्रीडा संचालनालयाकडून नोटीस देण्‍यात आली आहे, तर १७ जणांना बडतर्फ करण्‍यात आले आहे.

३. सरकारने राबवलेल्‍या ‘बोगस क्रीडा प्रमाणपत्र समर्पण’ योजनेमुळे १२८ जणांनी स्‍वत:ची बोगस क्रीडा प्रमाणपत्रे सरकारकडे सादर केली आहेत. याविषयीची सविस्‍तर बातमी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्‍यात आली होती. हे प्रकार रोखण्‍याविषयीच्‍या उपाययोजनेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने रणजित देओल यांना विचारले असता त्‍यांनी वरील उपाययोजना करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले,  तसेच यापुढे राष्‍ट्रीय स्‍तरावर पोचलेल्‍या खेळाडूंना प्राधान्‍य देण्‍याचा सरकार विचार करत असल्‍याचे देओल यांनी सांगितले.