‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद़्घाटन !
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेली काही वर्षे आपण पहात आहोत की, सातत्याने पर्यावरणाचा र्हास होत आहे. मुंबईचे प्रदूषण वाढत आहे, शाळा बंद ठेवण्याइतकी वाईट अवस्था देहलीची झाली होती. नद्या प्रदूषित होत आहेत. पंचगंगा ही देशातील ५ प्रमुख प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. अशा स्थितीत पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी या महोत्सवांची अत्यावश्यकता आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिली. १४ जानेवारीला ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद़्घाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, डॉ. संदीप पाटील, शिवसेना खासदार (शिंदे गट) श्री. संजय मंडलिक, ‘बी न्यूज’चे संपादक श्री. चारुदत्त जोशी, पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे उपस्थित होते.