घाटकोपर (मुंबई) येथील अनधिकृत मदरशाच्या विरोधात हिंदूंनी काढला मोर्चा !
मुंबई – हिंदूंनी मोर्चा काढल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो; मात्र ३ मजली अनधिकृत मदरसा उभा राहीपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. या पुढे धर्माच्या नावाखाली अनधिकृत गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली. घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत मशिदीच्या विरोधात १५ जानेवारी या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात उपस्थितांना संबोधित करतांना आमदार राणे बोलत होते. या मोर्च्यामध्ये स्थानिक हिंदु समाज, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, ‘‘या मोर्च्यानंतर एकाही हिंदूला त्रास दिला, तर माझ्याशी गाठ आहे. आम्ही कुणाच्याही अधिकृत गोष्टीला हात लावलेला नाही. नमाजपठणासाठी जेथे तुमची अधिकृत जागा आहे, तेथे नमाजपठण करा. सध्या राज्यात हिंदुत्वाचे सरकार आहे. हिंदूंवरील अन्याय सहन करणार नाही.’’
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना मदरशाच्या विरोधात तक्रार करणार्या भारत सोसायटी रहिवासी संघाचे सदस्य आणि हिंदु धर्मप्रेमी श्री. रवींद्र नलावडे म्हणाले,‘‘वर्ष २०२० मध्ये या अनधिकृत मदरशाच्या विरोधात मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही जागा हरित पट्ट्यात येत असूनही कोरोनाच्या काळात या ठिकाणी अवैधपणे मदरशाचे बांधकाम करण्यात आले. या प्रकरणी महानगरपालिकेडून नोटीस देण्यात आली. त्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयाने कागदपत्रे सादर करण्यासाठी बांधकाम तोडण्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही मुदत २३ जानेवारी २०२३ या दिवशी संपणार आहे.