१ कोटी ८६ लाख रुपयांचा घोटाळा २ कोटी ७५ लाख रुपयांच्या घरात !
नागपूर – येथील जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. प्रारंभी घोटाळा १ कोटी ८६ लाख रुपयांचा असल्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र हा घोटाळा आता २ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. याविषयीचा अहवाल पारशिवनी पंचायत समितीने पोलिसांना सादर केल्याचे समजते.
पंचायत समितीच्या चौकशीत आणखी १३ बँक खाती बनावट असल्याचे समोर आले. त्यांपैकी अनेकांची खाती ही दुहेरी असून बहुतांशी खाती ही रामटेक तालुक्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तींची आहेत. बनावट खाती गोठवण्यात यावीत, अशा आशयाचे पत्र प्रशासन बँकेला पाठवण्यात येणार आहे. बनावट खातेदारांची संख्या वाढल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
असा झाला निवृत्तीवेतन घोटाळा !
१. मृत कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन खाते जोडून त्या माध्यमातून प्रतिमासाला लाखो रुपयांचे वेतन जमा करण्याऐवजी त्यांच्या नावापुढे आपल्या नातेवाइकांच्या नावे बँक खाते जोडून निवृत्तीवेतन घेण्याचा प्रकार शिक्षण विभागात उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिला कनिष्ठ लिपिकेसह ६ जणांना अटक केली.
२. हा घोटाळा ऑक्टोबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आला होता. त्या वेळी संबंधित महिला लिपिक सरिता नेवारे हिला निलंबित करून या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी जिल्हा परिषद स्तरावरील ३ अधिकार्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली होती.
३. समितीच्या चौकशीत घोटाळ्यात वापरण्यात आलेली १७ निवृत्ती वेतनधारकांची खाती बनावट आढळून आली. चौकशी सिमतीच्या अहवालानुसार हा घोटाळा १ कोटी ८६ लाख रुपयांच्या आसपास होता. त्याच वेळी प्रशासनाने ही सर्व १७ बँक खाती गोठवण्याचे पत्र बँकेला दिले होते.
४. समितीच्या प्राथमिक चौकशीअंती यातील मुख्य सूत्रधार आरोपी सरिता नेवारे हिच्याविरुद्ध गुन्ह्या नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकामृतांच्या निवृत्तीवेतनात कोट्यवधींचा होणारा घोटाळा म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार ! |