सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना आजपासून होणार प्रारंभ !

श्री सिद्धरामेश्वर

सोलापूर, १० जानेवारी (वार्ता.) – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना आजपासून (११ जानेवारी) प्रारंभ होत असून प्रतिवर्षीप्रमाणे योगदंड पूजन, नंदीध्वजास साज चढवणे, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, दारूकाम, नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन हे धार्मिक विधी होणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेचे पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी श्री. राजशेखर हिरेहब्बू यांनी १० जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी यात्रेचे मानकरी आणि भाजपचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य मानकरी आणि पत्रकार उपस्थित होते.

१२ जानेवारी या दिवशी हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसर्‍या नंदीध्वजास साज चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे. १३ जानेवारी या दिवशी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करून धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीला सकाळी ८ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून प्रारंभ होणार आहे. १४ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आल्यानंतर संमती कट्ट्यावर सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा होणार आहे, तर १५ जानेवारी (मकरसंक्रांत) या दिवशी होम मैदानावर होमप्रदीपनाचा समारंभ होणार आहे. १६ जानेवारी या दिवशी किंक्रांत असून त्या दिवशी होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे, तर १७ जानेवारी या दिवशी नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.

नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा !

नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावेत, यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. रस्त्यांवर केबल वायरचे प्रमाण पुष्कळ असल्याने मिरवणुकीला अडथळा ठरत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांना सूचित केले आहे, असे श्री. राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस सर्वश्री मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, ओंकार हिरेहब्बू, सर्वेश हिरेहब्बू, यश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश उघडे, सोमनाथ मेंगाणे, भीमाशंकर म्हेत्रे, भीमाशंकर कुंभार, योगीनाथ इटाणे, चिदानंद मुस्तारे, तसेच विविध नंदीध्वजांचे ‘मास्तर’ उपस्थित होते.