हरदोई (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात मृत झालेल्यांचे निवृत्तीवेतन अन्य लोकांकडून लाटण्यात येत असल्याचे उघड !

हरदोई (उत्तरप्रदेश) – वृद्धांच्या निवृत्तीवेतनाच्या संदर्भात करण्यात आलेल्या पडताळणीतून ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या नावावर अन्य लोक पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. हरदोई जिल्ह्यात पडताळणीनंतर १३ सहस्र निवृत्तीवेतनधारक मृत झाल्याची माहिती समोर आली, तर ४५ सहस्रांपेक्षा अधिक लाभार्थी हे त्यांच्या पत्त्यावर रहातच नसल्याचे आढळून आले.

१. जिल्हा समाजकल्याण अधिकार्‍याने सांगितले की, आता अशा लोकांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले आहे. अंतिम पडताळणीनंतरच लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन देण्यात येईल. मृत निवृत्ती वेतनधारकाची माहिती घेण्याचे काम चालू आहे.

२. समाजकल्याण अधिकारी राजमती यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४२ सहस्र ४९५ वृद्ध निवृत्तीवेतनधारक आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ९७ सहस्र ३९८ जण या योजनेसाठी  पूर्णपणे पात्र आहेत. या सर्वांना आधारकार्ड प्रमाणित करण्याचे सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकल्यासच इतरांवर वचक बसेल !