गंमत म्हणून ईमेल पाठवल्याचे उघड !
बेंगळुरू – शहरातील ‘नॅशनल अॅकॅडमी फॉर लर्निंग’ ही शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल अन्य शाळेतील विद्यार्थ्याने पाठवल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली. या विद्यार्थ्याने गंमत म्हणून हा ईमेल पाठवल्याचे नंतर उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून कह्यात घेतले आणि राज्य बाल न्याय मंडळाच्या कह्यात दिले. ‘मी गुगल सर्चद्वारे शाळेचा अधिकृत ईमेल पत्ता मिळवला आणि गंमत म्हणून धमकीचा ईमेल पाठवला’, असे या मुलाने पोलिसांना सांगितले.
अ. ६ जानेवारी २०२३ ला सकाळी १०.३० च्या सुमारास ईमेल पाहिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले. ‘माझ्याकडे जिलेटिनच्या ४ कांड्या आहेत. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांचा मी स्फोट घडवून आणीन. – तुमचा आवडता विद्यार्थी’, असे या ईमेलमध्ये लिहिले होते.
आ. ईमेल मिळाल्यानंतर शाळेतील अनुमाने १ सहस्र विद्यार्थ्यांना वर्गांतून सुरक्षित स्थळी हालवण्यात आले. यामुळे पालक आणि स्थानिक यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला.
इ. बाँब शोधण्यासाठी पोलिसांनी बाँबशोधक पथक आणि श्वान पथक शाळेत तैनात केले; परंतु शाळेच्या आवारात कोणतीही स्फोटके सापडली नाहीत.
या प्रकरणाच्या अन्वेषणानंतर ही धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले.
संपादकीय भुमिकाशाळेत मुलांना नीतीमत्ता आणि सुसंस्कार न शिकवल्याने मुले ‘गंमत’ म्हणून असे प्रकार करून समाज आणि व्यवस्था यांना वेठीस धरतात. असले प्रकार रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवा ! |