(म्हणे) ‘द्वेषाच्या भूमीवर राममंदिर बांधले जात आहे !’

राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे द्वेषपूर्ण विधान !

राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह

पाटलीपुत्र (बिहार) – भारताची भूमी राममय आणि कृष्णमय मानली जात होती. आता हे सर्व नष्ट झाले आहे. आता राम रामायणातून पळून जातील. कणाकणांतून निघून जातील. राम आता भारताचा रहाणार नाही. आता केवळ एका मंदिरात राम राहील. द्वेषाच्या भूमीवर राममंदिराची निर्मिती होत आहे. राम त्याच एका मंदिरात बसेल. राम लोकांच्या हृदयांमध्ये नाही, तर दगडांमध्ये राहील. संघवाले हेच करत आहेत. आम्ही ‘रामवाले’ आहोत, ‘जय श्रीरामवाले’ नाही. संघवाल्यांचे राम कुठेही बसतील, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी केली आहे. अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

जगदानंद सिंह पुढे म्हणाले की, उन्माद करणारे रामाला बंदी बनवतील; मात्र रामाचा वास शबरीच्या झोपडीत आहे. भारतीय जनता युगांपासून रामायणाचा पाठ करत आली आहे. सकाळ-संध्याकाळ रामनाम जपत आहे; कारण त्यात जनतेला राम भेटतो. संघाला हे ठाऊक नाही की, लोकांच्या हृदयातील राम खेचून तो दगडांच्या प्रशस्त भवनामध्ये बंदी करून ठेवू शकत नाही.

संपादकीय भुमिका

  • जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?
  • ‘हिंदु सहिष्णु असल्याने त्यांना काहीही म्हटले, तरी ते आपले काहीही वाकडे करू शकणार नाहीत’, अशाच मानसिकतेत हिंदुद्वेषी आणि हिंदुद्रोही असल्याने अशी विधाने केली जातात. हिंदूंनी आता अशांना वैध मार्गाने धडा शिकवणे आवश्यक आहे !