महावितरणच्‍या संपामुळे पुणे येथील लघुउद्योगांना आर्थिक फटका, तर सर्वसामान्‍यांचे हाल !

पुणे – महावितरणचे खासगीकरण होऊ नये; म्‍हणून राज्‍यातील वीज कर्मचारी संपावर गेल्‍याने शहराच्‍या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्‍यामुळे नागरिक त्रस्‍त झाले, तर एक सहस्रांहून अधिक लघुउद्योग ठप्‍प झाल्‍याने त्‍यांना आर्थिक फटका बसला. बर्‍याच ठिकाणच्‍या वीजवाहिन्‍यांमध्‍ये बिघाड झाला होता. पुणे परिमंडलातील ९२ टक्‍के कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी संपात सहभागी झाले. अपुर्‍या मनुष्‍यबळाअभावी खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्‍यासाठी वरिष्‍ठ अधिकारी रात्रभर काम करत होते. सिंहगड परिसरातही १२ घंटे वीजपुरवठा खंडित असल्‍याने ३० सहस्र नागरिकांनी विजेअभावी दिवस काढला. पाणीपुरवठा योजना, मोठी रुग्‍णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालय इत्‍यादी ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत राहिला. संपानंतर बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.