प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंवर होणारी एकमार्गी कारवाई थांबवावी !

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार श्री. भरतशेठ गोगावले

मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांच्या वेळी एकमार्गी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार कारभार करतांना सर्व धर्मांना समान वागणून मिळणे अपेक्षित असतांना प्रदूषण मंडळाकडून होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंवरील एकमार्गी कारवाई थांबवून सर्वांना समान वागणूक द्यावी, या मागणीचे निवेदन शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध प्रकारचे अहवाल प्रकाशित करून एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करत आहे. वर्षातून काही दिवस येणार्‍या हिंदूंच्या सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्षभर, तसेच प्रतिदिन मशिदींवरील भोंग्यांवरील ध्वनीप्रदूषणाविषयी मात्र केलेल्या कारवाईचे प्रमाण नसल्यासारखे आहे.