१. सून घर सोडून निघून गेल्यावर लोकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडणे, त्या वेळी शांत राहून त्यांना उत्तरे देणे आणि ‘हे सर्व प्रारब्धानुसार झाले असून गुरुदेवांनी पुढे होणारा त्रास संपवला’, असा सकारात्मक विचार मनात येणे
‘मे मासात माझ्या मुलाचे लग्न झाले आणि दीड मासातच सून घरातून निघून गेली. ‘मला नांदायचेच नाही’, असे म्हणून गेली, ती परत आलीच नाही. लोकांनी सारखे प्रश्न विचारून आम्हाला भंडावून सोडले. ‘तुम्ही देवाचे इतके करता, तर तुमची सून कशी काय निघून गेली ?’ त्या वेळी ‘तिचे माझे देवाण-घेवाण इतकेच होते. ती इतकेच दिवस आमच्यासमवेत रहाण्याचे प्रारब्धात होते’, असे माझ्याकडून लोकांना शांतपणे सांगितले जायचे. त्या वेळी ‘देवाने माझे वाईट केले’, असा विचार माझ्या मनात मुळीच आला नाही. उलट ‘मला पुढे जो काही त्रास होणार होता, तो माझ्या गुरुदेवांनी आताच संपवला’, असा विचार होऊन माझ्याकडून गुरुदेवांप्रती सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मुलालाही अल्प कालावधीत या प्रसंगातून बाहेर पडता येणे
या प्रसंगातून मुलगाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्प कालावधीत बाहेर पडला. ‘असा प्रसंग घडला, तर घरातील लोकांना किती त्रास होतो’, हे आपण समाजात पहात असतो; पण परात्पर गुरुमाऊलीमुळेच आम्हाला हे सर्व सहन करण्याची शक्ती मिळाली. त्यांच्या शिकवणुकीमुळेच आम्हाला या प्रसंगाला तोंड देता आले. त्या वेळी ‘जे प्रारब्धात आहे, ते घडणारच आहे’, हे वाक्य ईश्वराने मनावर कोरले आहे’, असे वाटले.
३. ‘मुलाने साधना करावी’, ही अपेक्षा न्यून झाल्यावर मुलाने साधनेस प्रारंभ करणे
पूर्वी ‘मुलाने नामजप करावा, त्याचे आपत्काळात रक्षण व्हावे’, असे माझ्या मनात अपेक्षेचे विचार असायचे. नंतर ‘प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडत असते’, असा विचार करून ‘देवा, तुला जसे अपेक्षित आहे, तसे घडू दे’, अशी मी प्रार्थना चालू केली. तेव्हा मुलगा आपोआपच वहीत नामजप लिहायला लागला. तो नामजप लिहितांना म्हणायचा, ‘‘सत्संगात सांगितले आहे की, आपत्काळात नामच तारणार आहे.’’
४. रामनाथी आश्रमात एका संतांना भेटल्यावर आलेल्या अनुभूती
४ अ. शंखनाद ऐकू येऊन विष्णुलोकात असल्याचे जाणवणे : ४.१.२०२० या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तिथे आम्ही एका संतांना भेटलो. ते येण्यापूर्वी आणि ते आल्यावर सलग ५ मिनिटे मला शंखनाद ऐकू येऊन मी ‘विष्णुलोकातच आहे’, असे वाटत होते.
४ आ. बासरीचा नाद ऐकून वृंदावनात असल्याप्रमाणे जाणवणे : संतांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर मला सलग१० मिनिटे बासरीचा नाद ऐकू येत होता. तेव्हा ‘गोप-गोपींसह परात्पर गुरु वृंदावनात आहेत’, असे मला जाणवले.
४ इ. शिवमंदिरात असल्याप्रमाणे थंडावा जाणवणे : सत्संगात शेवटची १० मिनिटे एवढा थंडावा वाटत होता की, ‘आपण शिवमंदिरात बसलो आहोत’, असे मला वाटत होते. त्यानंतर आम्ही ‘सर्वच जण अंतराळात बसलो आहोत’, असे मला वाटले.
४ ई. त्या संतांकडून आनंदाच्या पुष्कळ लहरी येत होत्या. इथे येण्यापूर्वी माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी पुष्कळ दुखत होते; परंतु संतांच्या दर्शनाने ते दुखणे न्यून झाले.
५. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती
५ अ. नामजप करतांना ध्यानमंदिरात निर्गुण तत्त्व जाणवून मन निर्विचार होणे : मी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना तिथे मला पुष्कळ प्रमाणात निर्गुण तत्त्व जाणवत होते. ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र लालभडक होऊन वेगाने फिरत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य मिळून माझे मन निर्विचार झाले आणि नामजपही चांगला झाला.
५ आ. आरती करतांना चैतन्य जाणवून सर्व देवता स्थिर उभ्या असल्याचे जाणवणे : ५.१.२०२० या दिवशी सकाळी ध्यानमंदिरात आरती करतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘सर्व देवता तेथे स्थुलातून स्थिर उभ्या आहेत’, असे मला जाणवले. इतर वेळी नामजप करतांना ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे किंवा इतर देवतांच्या हातांतील शस्त्रांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवते; पण आरती करतांना सर्व देवता स्थिर असल्याचे जाणवले. मला अनाहतचक्राच्या ठिकाणी पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.
५ इ. परात्पर गुरुदेवांच्या पादुकांकडे बघून नामजप करतांना साधकांसाठी प्रार्थना केल्यावर सूर्यदेवाच्या रूपात गुरुदेवांचे विराट रूप दिसून ‘ते प्रकाशरूपी आशीर्वादाचा हात सर्वत्र फिरवत आहेत’, असे दिसणे : मी परात्पर गुरुदेवांच्या पादुकांकडे बघून नामजप करतांना मला ‘सर्व साधक ध्यानमंदिरात बसले असून गुरुदेव सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत’, असे दृश्य दिसू लागले. त्या वेळी मी सातारा जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी प्रार्थना केली. तेव्हा मला सूर्यदेवाच्या रूपात गुरुदेवांचे विराट रूप दिसून गुरुदेव त्यांचा प्रकाशरूपी आशीर्वादाचा हात सर्वत्र फिरवत आहेत आणि साधकांचे त्रास दूर होऊन सर्व जण आनंदी झाले आहेत’, असे जाणवले.’
– श्रीमती अनिता भोसले, कराड, जिल्हा सातारा.(७.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |