१. वडूज (जिल्हा सातारा) येथून रामनाथी आश्रमात आल्यावर लगेचच ‘बी.ए.च्या प्रथम वर्षाची परीक्षा आहे’, असे कळणे, परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर ‘परीक्षा पुढील आठवड्यात आहे’, असे समजणे
‘१०.६.२०२२ या दिवशी मी आणि माझे यजमान श्री. नीलेश कुंभार वडूज (जिल्हा सातारा) येथून ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो. १९.६.२०२२ या दिवशी आम्ही सातार्याला परत जाणार होतो; पण ‘१३.६.२०२२ या दिवशी माझी बी.ए.च्या प्रथम वर्षाची (‘एफ्.वाय.बीए.’ची) परीक्षा आहे’, असा मला भ्रमणभाषवर लघुसंदेश (‘मेसेज’) आला. त्या वेळी ‘आता परीक्षेसाठी लगेच सातार्याला जावे लागेल’, असे मला वाटले. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, तुमच्या इच्छेने सर्व होऊ द्या.’
दुसर्या दिवशी ‘माझी परीक्षा २६.६.२०२२ या दिवशी आहे’, असे मला समजले. ‘हे केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच होऊ शकले’, असे लक्षात येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि कृतज्ञता व्यक्त झाली. या प्रसंगातून ‘देवच सर्वकाही करतो; कारण ‘तोच कर्ता करविता’ आहे’, याची मला जाणीव झाली.
२. महाप्रसाद ग्रहण करतांना प्रार्थना करणे आणि महाप्रसादातील चैतन्यामुळे सेवा करतांना आनंदी अन् उत्साही वाटणे
आश्रमात महाप्रसाद ग्रहण करतांना मी ‘हे परात्पर गुरु डॉक्टर, हे अन्नपूर्णादेवी, या प्रसादातून मला तुमची चैतन्यशक्ती मिळू दे आणि आमच्याकडून हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी सेवा घडू दे’, अशी प्रार्थना करत होते. या प्रार्थनेमुळे आश्रमात रात्री उशिरापर्यंत सेवा करतांना मला कंटाळा यायचा नाही. मला आनंदी आणि उत्साही वाटायचे. घरी कामे करतांना मात्र मला पुष्कळ थकवा येतो.
३. आश्रमातील चैतन्यामुळे त्रास उणावून हलके वाटणे
गुरुकृपेमुळे मला आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची आणि संत अन् हिंदुत्वनिष्ठ यांना भोजन वाढण्याची सेवा मिळाली होती. ही सेवा करतांना पहिल्या दिवशी माझे डोके जड झाले; परंतु नंतर आश्रमातील चैतन्यामुळे सेवा करतांना मला हलके वाटू लागले.
४. साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
आश्रमातील साधक एकमेकांची पुष्कळ प्रेमाने काळजी घेतात. साधकांमध्ये पुष्कळ नम्रता आहे. प्रत्येक कृती करतांना साधक परात्पर गुरुदेवांचे स्मरण करून आणि त्यांना शरण जाऊन जयघोष अन् प्रार्थना करतात.
असे सुंदर आश्रमजीवन अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. ज्योती नीलेश कुंभार, वडूज, जिल्हा सातारा. (२१.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |