ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करण्याचे महत्त्व

‘भारतात रत्नांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. प्राचीन ऋषी, ज्योतिषी, वैद्याचार्य आदींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये ‘रत्नांचे गुणधर्म आणि उपयोग’, यासंबंधी विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.

रत्नांचे प्रकार

१. रत्नांचे प्रकार

रत्नांचे खनिज, जैविक इत्यादी प्रकार आहेत. जैविक रत्ने कीटक अथवा जीवजंतूंपासून निर्माण होतात, उदा. मोती आणि पोवळे. खनिज रत्ने भूगर्भात रासायनिक क्रियेमुळे शेकडो वर्षांनी सिद्ध होतात, उदा. माणिक, पाचू, नीलम इत्यादी. त्यांना पैलू पाडून शुद्ध करण्यात येते.

श्री. राज कर्वे

२. रत्न धारण करण्यामागील उद्देश

रत्ने हे नैसर्गिक दिव्य पदार्थ आहेत. रत्नांमधून त्यांच्या गुणधर्मांप्रमाणे सूक्ष्म ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होत असते, तसेच ग्रहांकडून येणारी सूक्ष्म ऊर्जा रत्नांमध्ये आकृष्ट होते. त्यामुळे रत्न धारण करणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांवर रत्नातील सूक्ष्म ऊर्जेचा परिणाम होतो. रत्ने हे घन पदार्थ असल्याने त्यांच्यात सूक्ष्म ऊर्जा अधिक कालावधीपर्यंत टिकून रहाते.

३. रत्ने आणि ग्रह यांचा संबंध

प्रत्येक रत्नाला विशिष्ट रंग आहे. आधिदैविक विज्ञानानुसार प्रत्येक रंगात सत्त्व, रज आणि तम हे गुण अल्प-अधिक प्रमाणात असतात. उदा. काळ्या रंगात तमोगुण, लाल रंगात रजोगुण आणि पिवळ्या रंग सत्त्वगुण अधिक असतो. रत्ने आणि ग्रह यांच्या रंग-समानतेवरून त्यांच्यातील संबंध निश्चित केला गेला आहे. उदा. ‘माणिक’ हे लाल रंगाचे रत्न रवीशी संबंधित आहे, ‘पुष्कराज’ हे पिवळ्या रंगाचे रत्न गुरु ग्रहाशी संबंधित आहे इत्यादी.

४. रत्नांचा ज्योतिषशास्त्रीय उपयोग

व्यक्तीच्या जन्मकुंडलीत जो ग्रह बलहीन किंवा दूषित असतो, त्या ग्रहाशी संबंधित रत्न धारण केले जाते किंवा शरिरात जी ऊर्जा वाढणे आवश्यक आहे, त्या ऊर्जेशी संबंधित रत्न धारण करणे लाभदायक असते. उदा. व्यक्तीत आत्मविश्वास अल्प असल्यास तिने रवीचे माणिक रत्न धारण करणे लाभदायक आहे. रत्न अंगठीत जडवून घालणे उत्तम होय. पुढील सारणीत ‘रत्नांशी संबंधित ग्रह, रत्नांचा उपयोग आणि हाताच्या कोणत्या बोटात कोणते रत्न धारण करावे’, ते दिले आहे.

५. रत्ने धारण करण्यासंदर्भातील काही सूत्रे

अ. स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात रत्न धारण करावे. योगशास्त्रानुसार डावा हात चंद्रनाडीशी आणि उजवा हात सूर्यनाडीशी संबंधित आहे.

आ. रत्न धारण करण्यापूर्वी त्यावर मंत्रपूर्वक अभिषेक करतात. त्यामुळे रत्नावर चैतन्याचा संस्कार होतो.

इ. ज्या ग्रहाशी संबंधित रत्न आहे, त्या ग्रहाच्या वारी सूर्याेदयानंतर रत्न धारण करावे.

ई. रत्न भंग पावल्यास ते वापरू नये.

६. कृत्रिम रत्ने वापरणे टाळा !

सध्याच्या काळात कृत्रिम (synthetic) रत्ने मोठ्या प्रमाणात बनवली जातात. नैसर्गिक आणि कृत्रिम रत्ने दिसण्यास एकसारखी असतात; परंतु कृत्रिम रत्ने तुलनेने ठिसूळ असतात, त्यामुळे त्यांना पैलू अल्प असतात. कृत्रिम रत्नांचे मूल्य अल्प असते; परंतु नैसर्गिक रत्नांमध्ये असलेली दैवी ऊर्जा कृत्रिम रत्नांमध्ये नसते. त्यामुळे ग्रहदोषांच्या आणि व्याधींच्या निवारणासाठी नैसर्गिक रत्ने वापरणे लाभदायक आहे.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१२.२०२२)