गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांनी आयोजकांवर कारवाई करावी ! – न्यायालयाचा आदेश

सनबर्नच्या आयोजकांकडून ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमांचे उल्लंघन

पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) – २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत झालेल्या सनबर्न महोत्सवात ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याविषयी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. यावर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने ‘नियमांचे उल्लंघन केल्यावरून सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांनी कारवाई करावी’, असा आदेश दिला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचिकेत म्हटले आहे की, २८.१२.२०२२ ते ३०.१२.२०२२ या कालावधीत झालेल्या सनबर्न महोत्सवात ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमांचे उल्लंघन झाले आहे. हा कार्यक्रम उघड्या मैदानात आणि रहिवासी वस्तीजवळ होता आणि त्यामध्ये आवाजाची पातळी ५५ डेसीबलहून अधिक होती. यामुळे आयोजकांनी ‘पर्यावरण नियंत्रण कायदा’ आणि ‘हवा नियंत्रण कायदा’ यांचे उल्लंघन केले असून या कायद्यांनुसार कारवाईस आयोजक पात्र आहेत.’’ या कार्यक्रमातील आवाजाच्या पातळीविषयीची २८ डिसेंबर या दिवसापासूनची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केली असून कार्यक्रमात अनेक वेळा आवाजाची पातळी ५५ डेसीबल या मर्यादेहून अधिक होती, असे लक्षात आले आहे.

यासंबंधी सनबर्नच्या आयोजकांनी आवाजाच्या पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यक्रमाच्या ठिकाणी बसवावी, तसेच आवाजाची पातळी दर्शवणारे फलक कार्यक्रमाच्या ठिकाणी लावावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने सनबर्नच्या आयोजकांना दिला होता.