सहकारनगर (पुणे) येथील सहजीवन व्याख्यानमालेतील ‘भ्रष्टाचार आणि सामान्य माणूस’ या विषयावरील दुसरे पुष्प
पुणे – देशाच्या सध्याच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराची निर्मिती ही राजकीयपेक्षा प्रशासकीय यंत्रणेतूनच होत असून या यंत्रणेवर प्रभावी अंकुश ठेवण्यात सर्वच घटकांना अपयश येत आहे. भांडवलशाहीने सर्वच क्षेत्रे काबीज केल्यामुळेही भ्रष्टाचार बोकाळला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्याला भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते, असा कांगावा नोकरशाहीकडून म्हणजेच प्रशासकीय अधिकार्यांकडून करण्यात येतो; मात्र प्रशासकीय अधिकार्यांनी ठरवल्यास ते भ्रष्टाचार थांबवू शकतात, असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. सहकारनगर येथील सहजीवन व्याख्यानमालेतील ‘भ्रष्टाचार आणि सामान्य माणूस’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफतांना झगडे यांनी भ्रष्टाचाराच्या विविध पैलूंची मूलभूत मांडणी केली. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक नसतो, असे नमूद करून त्यांनी प्रामुख्याने आर्थिक भ्रष्टाचाराचा वेध घेतला.
भ्रष्टाचाराविषयी महेश झगडे यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वच देशांमधील भ्रष्टाचाराची पहाणी केली असता स्वीडन, नॉर्वे, फ्रान्स, जर्मनी आदी देशांत कमीतकमी भ्रष्टाचार होतो. या देशांना त्यात शंभरपैकी ८८ गुण देण्यात आले. भारताचे गुण केवळ ४० आहेत.
२. भ्रष्टाचाराने सामान्य माणसाची लूट होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येते; मात्र खरी स्थिती उलट आहे. लोकशाहीमध्ये सामान्य माणूस हाच राजा असून लोकप्रतिनिधी-अधिकारी हे सेवक आहेत. लोकशाही मजबूत करणे हाच भ्रष्टाचारावरील खरा उपाय आहे.
३. कोणत्याही मंत्र्याने एखादा अवैध आदेश दिला, तरी तो पाळण्याचे बंधन अधिकार्यावर नाही. असा आदेश लेखी मागणे आणि त्याची कार्यवाही न करणे, हा अधिकार्यांचा अधिकार आहे. अधिकार्यांचे फारफार तर स्थानांतर होऊ शकते; मात्र त्याला भ्रष्टाचार थांबवता येतो. प्रत्यक्षात अधिकार्यांकडून होणार्या भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठे आहे.
४. सार्वजनिक शासकीय क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील भ्रष्टाचारही मोठा आहे. भांडवलशाहीने सर्वच क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले असून खरी लूट या भांडवलशाहीकडूनच होत आहे. त्यामुळे केवळ काही हातांमध्ये संपत्तीचे केंद्रीकरण होत असून त्यावर उपाय करण्याची आवश्यकता आहे. या देशात एकेकाळी सर्वाधिक नैतिकता होती. ती नैतिकता आता कुठे गायब झाली, असा प्रश्नही झगडे यांनी केला.