‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून अधिवक्त्या राणी सोनवणे, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे, श्री. पराग गोखले, डॉ. नीलेश लोणकर, प्रा. विठ्ठल जाधव

पुणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंवर होणार्‍या अनेक प्रकारच्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६ वाजता मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार भवन, पुणे येथे ही पत्रकार परिषद पार पडली. भाजप कसबा मतदारसंघ, पुणेच्या सरचिटणीस आणि अधिवक्त्या राणी सोनावणे, ह.भ.प. दत्तात्रय तुकाराम चोरघे, अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि खजिनदार, चिंतामणी प्रासादिक दिंडी (देहू ते पंढरपूर – तुकोबाराय दिंडी, नंबरक्रमांक ३०), स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगावचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव हेही उपस्थित होते.

या वेळी भाजप कसबा मतदारसंघ, पुणेच्या सरचिटणीस आणि अधिवक्त्या राणी सोनावणे म्हणाल्या की, लव्ह जिहाद म्हणजेच धर्म लपवून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाह केला जातो. त्यानंतर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. हे थांबवायचे असेल, तर उत्तरप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा व्हायला हवा. यासाठी संघटितपणे मागणी करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.

मंदिरे भक्तगणांच्या कह्यात द्यावीत, ही सभेच्या निमित्ताने मागणी ! – ह.भ.प दत्तात्रय तुकाराम चोरघे, अ.भा. वारकरी मंडळ सदस्य

मंदिर सरकारीकरण झाल्यामुळे भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांना हिंदूंकडून निधी येतो, त्याचा वापर भक्त आणि हिंदू यांच्या कल्याणासाठी व्हावा, अशी अखिल भारतीय वारकरी संप्रदाय शासनाला विनंती करत आहे. मंदिरांची भूमी त्यांना परत मिळावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील आहे आणि त्यांना यात यशही येत आहे. मंदिरे भक्तगणांच्या कह्यात द्यावीत, अशी मागणी आपण या हिंदु राष्ट्र-जागृती  सभेच्या निमित्ताने करत आहोत. यासाठी सर्वांनी या सभेला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

हिंदूंचे संघटन हडपसर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून दिसू द्या ! – डॉ. नीलेश लोणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच

आर्थिक आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. हे थांबवायचे असेल तर धर्मांतरणविरोधी कायदा व्हायला हवा. यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. हे संघटन हडपसर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून दिसू द्या, असे आवाहन केले.

या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव म्हणाले की, सभेच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण देणारे ग्रंथप्रदर्शन लावण्यात येणार आहे. जिज्ञासूंनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार व्हावे, जेणेकरून धर्मशिक्षण घराघरांत पोचेल. या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्मरक्षण, क्रांतीकारक, काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.

सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, तसेच अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी दिली.

३१ डिसेंबरला सभेच्या प्रचारासाठी भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले. या सभेसाठी ५० हून अधिक गावांमध्ये प्रसार करण्यात आला असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्शा उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत, तरी सर्व हिंदु बांधवांनी अधिकाधिक संख्येने या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री.पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत केले.