पुणे, २६ जुलै (वार्ता.) – ‘पुणे सार्वजनिक सभे’चे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई यांना २४ जुलै या दिवशी देण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एअर व्हाईस मार्शल श्री. भूषण गोखले (निवृत्त) उपस्थित होते आणि ‘सार्वजनिक काका’ यांच्या सातव्या वंशज अलका मांडके जोशी याही उपस्थित होत्या. या वेळी ‘पुणे सार्वजनिक सभे’चे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या प्रतिमेला हार घालून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुणे सार्वजनिक सभेचे कार्याध्यक्ष श्री. शिदोरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात सांगितला आणि पुणे सार्वजनिक सभेच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.
एअर व्हाईस मार्शल श्री. भूषण गोखले (निवृत्त) यांचा सत्कार श्री. शिदोरे यांनी केला. श्री. कालेकर यांनी पुरस्कारार्थी श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई यांचा परिचय करून दिला आणि शाल, श्रीफळ, पुरस्कार रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
श्री. विद्याधर नारगोलकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती देण्यात आली.