नागपूर – ‘अमृत अभियाना’च्या अंतर्गत अकोला शहरात जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरता नेमलेल्या ‘ए.पी. ॲण्ड जी.पी. एजन्सी’ने केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल’, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सांगितले.
या योजनेची कामे अपूर्ण राहिल्याविषयी सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.
या वेळी मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, “अकोला शहरातील जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निधीची न्यूनता भासणार नाही. या कामांच्या देयकांमध्ये तफावत दिसून येत आहे. कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. या योजनेच्या कामात एका पाण्याच्या टाकीविषयी स्थानिकस्तरावर वाद आहे. हा वाद सामंजस्याने सोडवून काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ‘अमृत अभियान योजना टप्पा २’च्या अंतर्गत कामाविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली जाईल’, असे मंत्री सामंत यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.