महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

गृह विभागाकडून मद्यविक्री नियोजनाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर, २४ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात मद्य पिऊन अनेकांचा मृत्यू आणि संसार उद्ध्वस्त होत असतांना सरकारने महसूल वाढीसाठी देशी आणि विदेशी मद्य दुकानदारांना रात्री मद्यविक्रीच्या वेळेत शिथिलता दिली आहे. याप्रमाणे नाताळ आणि पाश्चात्त्य पद्धतीने साजरा करण्यात येणार्‍या ३१ डिसेंबर नूतन वर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबर या दिवशी रात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्री करण्याची अनुमती मद्य दुकानदारांना दिली आहे. त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.

गृह विभागाने महाराष्ट्र मद्यबंदी कायद्याचे कलम १३९ (१)(सी) आणि कलम १४३ (२) (एच्-१)(iv) अन्वये ही अनुमती दिली आहे. या निर्णयाचा हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांनी निषेध केला आहे. ‘मद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतांनाही सरकार आंधळेपणाची भूमिका घेत मद्यांची दुकाने उघडण्याची अनुमती कशी देते ?’ असा प्रश्न उपस्थित करत शहरी आणि ग्रामीण भागांतील लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गृह विभागाने हा निर्णय घोषित करतांना प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, वेळेच्या शिथिलतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार उपरोक्त वेळेतील शिथिलता नाकारू शकतील.

पत्रकात मद्यविक्रीची माहिती देतांना चुकीचा उल्लेख !

गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवलेल्या पत्रात चुकीची वाक्यरचना करण्यात आली आहे. पत्रात रात्री विलंबापर्यंत मद्यविक्रीस अनुमती देतांनाचा उल्लेख करतांना शिथिल करावयाच्या कालावधीच्या रकान्यात रात्री १०.३० ते दुसर्‍या दिवशी ‘पहाटे १ वाजे’पर्यंत असे म्हटले आहे. वास्तविक पत्रात ‘रात्री १ वाजल्यानंतर’ असे म्हणायला हवे होते; मात्र या पत्रकात ‘पहाटे १ वाजल्यानंतर’ असे ३ वेळा म्हटले आहे, तर ‘पहाटे ५ वाजेपर्यंत’ असे ४ वेळा म्हटले आहे.