गोव्यात डान्स बार नाहीत, अवैधपणे डान्स बार चालवत असल्यास पोलिसांना संपर्क करा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २१ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यात डान्स बार नाहीत, तरीही कुणीही अवैधपणे डान्स बार चालवत असल्यास त्याविषयी स्वत: कायदा हातात न घेता त्याविषयी पोलिसांकडे ‘१००’ किंवा ‘११२’ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाताळची सुटी आणि आगामी ख्रिस्ती नववर्ष यांच्या पार्श्वभूमीवर कायदा अन् सुव्यवस्था राखण्यासंबंधी पोलिसांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘पर्यटकांची वर्दळ असलेल्या किनारपट्टी भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ‘होम गार्ड’च्या धर्तीवर ‘टुरिस्ट गार्ड’ नेमण्यात येणार आहेत. ‘टुरिस्ट गार्ड’ भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांना त्यांचा देशात परत पाठवण्यामध्ये गोवा राज्य देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. बहुतांश अमली पदार्थ प्रकरणांसह इतर प्रकरणांत एकूण ७०० विदेशी नागरिकांना कह्यात घेण्यात आले होते आणि यातील ६५० विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.  इतरांना त्यांच्या देशात पाठण्याची प्रक्रिया चालू आहे.’’