महाराष्ट्राला इंचभरही भूमी देणार नाही !  

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे विधीमंडळात विधान !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेळगाव – मागील सरकारने घेतलेली भूमिका आणि राज्याच्या सीमा, पाणी आणि भाषा यांविषयीची आमची भूमिका स्पष्ट आहे. राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. महाराष्ट्राला एक इंचही भूमी देणार नाही, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कर्नाटक राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात केले. सीमावादावर कर्नाटक सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कर्नाटक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव संमत केला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली. कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्री बोम्माई यांनी वरील विधान केले. मुख्यमंत्री बोम्माई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक विधीमंडळामध्ये  सीमावादावर ठराव संमत करण्यात येणार आहे.

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी बोम्माई यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. सिद्धरामय्या म्हणाले की, या प्रकरणात कोणत्याही वादाचा प्रश्‍नच उद्भवत नाही.