मृत्यूपत्र : कायद्याने मिळालेले वरदान !

माणसाने कितीही नाही म्हटले, तरी स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीविषयी तो अधिक जागरूक असतो. ‘आपल्या पश्चात् आपल्या मालमत्तेचे काय होणार ?’, हा प्रश्न प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी पडतच असतो. ‘कुठे घेऊन जाणार आहे, हा पैसा ?’, ‘आपल्या नंतर मालमत्तेचे काय होणार, हे पहायला आपण असणार का ?’, असे अनेकांना वाटत असते. एका अर्थी हे योग्यच असले, तरी आपण आपल्या हयातीच आपल्या मालमत्तेचे भविष्यात काय करायचे, हे ठरवू शकतो.

आपण कायद्यामध्ये असलेल्या अनेक तरतुदींचा क्वचित्च गांभीर्याने विचार करतो. अनेक जण ‘सदरची तरतूद माझ्यासाठी नाहीच’, अशी पक्की धारणा मनात बाळगून जगत असतात. मृत्यूपत्राचे महत्त्व समजून घेतले, तर आपल्या कायद्यातील ही तरतूद प्रत्येकासाठीच वरदान आहे, याची निश्चिती पटेल. मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे, तसेच ते तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकांना सामाजिक कार्याची आवड असते. काही व्यक्तींच्या संदर्भात कौटुंबिक दायित्वामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ही इच्छा मनातच राहिलेली असते. अशा वेळी मृत्यूपत्राच्या माध्यमातून संपूर्ण मालमत्ता अथवा तिचा काही भाग दानही करता येतो. काही व्यक्ती त्यांच्या आर्थिक व्यवहाराविषयी कमालीची गुप्तता पाळत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी इतकेच काय, तर पत्नी, मुले, आई-वडील यांपैकी कुणालाही त्यांच्या आर्थिक व्यवहाराची कल्पना नसते. काही व्यक्ती ठराविक मालमत्तेच्या खरेदी-विक्रीविषयीची माहिती काही व्यक्तीगत कारणास्तव कुटुंबियांना जाणीवपूर्वक देत नाहीत. अशा परिस्थितीत जर मृत्यूपत्र केलेले असेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात् या मालमत्तेविषयीची माहिती तिथे निकटवर्तीय आणि कुटुंबीय यांना मिळू शकते. मालमत्तेच्या संदर्भात जर काही अडचणी आल्या, तर त्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायलाही साहाय्य होते. आपण आपल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करून ठेवले, तर आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची वाटणी करू शकतो.

१. मृत्यूपत्रामुळे योग्य व्यक्तीकडे संपत्ती हस्तांतरित होणे

मृत्यूपत्र हे कायदेशीर दस्तऐवज (कागदपत्र) आहे. आपल्या पश्चात् मालमत्ता योग्य व्यक्तीच्या हातात जावी, या हेतूने कायद्यानुसार सिद्ध केलेले कागदपत्र म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र होय. सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद किंवा आर्थिक नियोजन करतांना सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा विचार करत असते. मृत्यूपत्रान्वये आपल्या मालमत्तेची विभागणी आपल्या इच्छेनुसार करता येते. कुटुंबातील व्यक्तींच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार मालमत्तेचे वाटप मृत्यूपत्रानुसार करता येणे सहज शक्य आहे. मृत्यूपत्राच्या माध्यमातून कुटुंबातील काही व्यक्तींना तुमच्या मालमत्तेतून तुम्ही बाजूलाही करू शकता.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

२. मृत्यूपत्र सिद्ध करतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे  

अ. वयाची १८ वर्षे पूर्ण असणारी कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते. ते लिखित स्वरूपात असावे. त्यावर मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीने साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक असते. मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून अन्य दोन व्यक्तींची स्वाक्षरी, दिनांक, वार, वेळ आणि ठिकाण यांची नोंद असणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र सिद्ध करतांना व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ अन् सक्षम असावी. याविषयी वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्रही असणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही.

आ. मृत्यूपत्राद्वारे व्यक्तीच्या मालकीची संपूर्ण मालमत्ता त्याच्या इच्छेनुसार वारसांना विभागून देता येते, मालमत्ता दान करता येते अथवा एखाद्या संस्थेच्या नावावरही देता  येते. जेव्हा एखादी हिंदु व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवते, तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात् संपत्तीचे वाटप हे ‘भारतीय वारसा हक्क कायदा १९२५’ मधील तरतुदींनुसार केले जाते; परंतु मृत्यूपत्र नसेल, तर व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप हे ‘हिंदु वारसा हक्क कायदा १९५६’च्या तरतुदीनुसार केले जाते.

इ. मृत्यूपत्र सिद्ध झाल्यावर ते कायदेशीर सल्लागार किंवा योग्य त्या अधिकार्‍याकडे किंवा सुरक्षित व्यक्तीकडे सुपूर्द करावे. त्यामुळे आवश्यकता असेल. तेव्हा ते सादर करता येईल.

ई. मृत्यूपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नसले, तरी ती करणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र नोंदणी करण्यासाठी आपण वास्तव्यास असलेल्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन केलेले मृत्यूपत्र सादर करावे. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आणि सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर मृत्यूपत्राची नोंदणी केली जाते.

३. मृत्यूपत्रामुळे कोणत्या मालमत्तेची विभागणी करता येते ?  

मिळकतीचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. एक आहे स्वकष्टार्जित आणि दुसरी वडिलार्जित मिळकत. व्यक्तीला वडिलार्जित मिळकतीतील कायदेशीर हिश्यातून मिळणार्‍या संपत्तीचे मृत्यूपत्र करता येते. मिळकतीमध्येही अजून दोन उपप्रकार आहेत.

अ. चल मिळकत : पैसे, फिक्स डिपॉझिट (मुदत ठेव), सोने, चांदी, वाहन आदी.

आ. अचल मिळकत : शेतभूमी, भूखंड, घर, सदनिका इत्यादी. या दोन्ही प्रकारच्या मिळकतीचे मृत्यूपत्र करता येते.

४. मृत्यूपत्रान्वये मिळकत कुणाला देता येते ?

मृत्यूपत्रान्वये वारस, धर्मादाय न्यास, संस्था, सोसायटी, आप्तेष्ट आणि नातेवाईक आदींना मृत्यूपत्रान्वये मिळकत देता येते. आपले कायदेशीर वारस असतांना त्यांना मृत्यूपत्रान्वये मिळकत न देता ती अन्यत्र मृत्यूपत्रान्वये कायदेशीरपणे दान करता येते.

५. मृत्यूपत्रात सुधारणा करायची असल्यास कशी करावी ?

एकदा केलेले मृत्यूपत्र पालटता येते किंवा त्यात सुधारणाही करता येतात. मालमत्तेची खरेदी वा विक्री, लग्न किंवा घटस्फोट, मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीचा मृत्यू किंवा मुलाचा अथवा नातवंडाचा जन्म इत्यादींसारख्या अनेक कारणांमुळे मृत्यूपत्र पालटण्याची आवश्यकता पडते. मृत्यूपत्र पालटण्याची प्रक्रिया अगदी सहज शक्य आहे. पहिले मृत्यूपत्र रहित करून दुसरे मृत्यूपत्र करता येते किंवा मृत्यूपत्राला कधीही नवीन पुरवणी जोडता येते. ही पुरवणी जोडण्यासाठी मृत्यूपत्राप्रमाणेच साक्षीदारांच्या समक्ष नवीन पुरवणीपत्रावर स्वाक्षरी करावी लागते. साक्षीदाराच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी दिनांक, वार आणि स्थळ यांचा उल्लेख करणे आवश्यक असते. एकाहून अधिक इच्छापत्र एकाच वेळी अस्तित्वात असतील, तर दिनांकानुसार किंवा वेळेनुसार ज्या इच्छापत्रावर शेवटची स्वाक्षरी केली गेली असेल, म्हणजेच शेवटचे इच्छापत्र केलेले असेल, तेच ग्राह्य मानले जाते. नवीन मृत्यूपत्र सिद्ध करतांना अथवा पुरवणी मृत्यूपत्र जोडतांना व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

६. मृत्यूपत्र न केल्याने होणारे तोटे  

मृत्यूपत्र नसल्यास मिळकत नावावर करतांना कायदेशीर तरतुदीनुसार नावावर करणे बंधनकारक असते. कायद्यातील तरतुदी क्लिष्ट आहेत. त्यामुळे मृतकाच्या नातेवाइकांना मिळकत नावावर करण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तसेच मालमत्तेचा अधिकार मिळवायला पुष्कळ वेळ आणि पैसा व्यय करावा लागू शकतो. यात काही वेळा न्यायालयाकडूनही हस्तक्षेप केला जातो. तसेच आपल्या हयातीत सर्वकाही ठिक असतांना आपल्या पश्चात् मिळकतीवरून वाद निर्माण होऊ शकतात. त्यात अनेकांचा वेळ आणि पैसा नाहक व्यय होऊन त्यांना मानसिक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन कायद्याने दिलेल्या मृत्यूपत्राच्या वरदानाचा उपयोग करून घ्यावा. आपण आपल्या मिळकतीचे आपल्या हयातीतच आपल्या इच्छेने वर्गीकरण करू शकतो.

– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद (११.१२.२०२२)

मृत्यूपत्रातील महत्त्वाच्या कायदेशीर संज्ञा आणि त्याचा अर्थ

१. टेस्टेटर : मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती

२. मृत्यूपत्र व्यवस्थापक :  मृत्यूपत्राचा व्यवस्थापक म्हणजे एक्झिक्युटर. तो मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीचा कायदेशीर प्रतिनिधी असतो. मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे मृत्यूपत्र सादर करण्याचे दायित्व या व्यवस्थापकावर असते.

३. वारसदार आणि लाभार्थी : वारसदार, म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीचा ‘कायदेशीर वारस’ होय आणि ज्याच्या लाभात मिळकतीविषयी मृत्यूपत्र करून ठेवले आहे, त्याला ‘लाभार्थी’ म्हणतात.

४. प्रोबेट : प्रोबेट ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. यात मृत्यूपत्रासंबंधी उद्भवणार्‍या दाव्यांची तक्रार निकालात काढून कायद्यानुसार वैध असणार्‍या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचे वर्गीकरण केले जाते.’

– अधिवक्ता नीलेश सांगोलकर