ऐतिहासिक सज्जनगडावर लवकरच ‘रोप वे’ला प्रारंभ

धार्मिक आणि पर्यटनक्षेत्र असणारा ऐतिहासिक सज्जनगड

सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनक्षेत्र असणार्‍या ऐतिहासिक सज्जनगडावर लवकरच ‘रोप वे’च्या बांधकामास प्रारंभ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मार्ग निधी योजने’ अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र सज्जनगडावर प्रतिदिन असंख्य भाविक आणि पर्यटक येतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी ‘रोप वे’ची सुविधा व्हावी, ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवत गडावर ‘रोप वे’ व्हावा, यासाठी केंद्रीय मार्ग निधी २०२२-२३ अंतर्गत ‘स्काय वॉक’ आणि ‘लिफ्ट’साठी १० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. ‘वाहनतळ ते अंग्लाईदेवी मंदिर’, असा ‘रोप वे’ असणार आहे, तर पुढे ‘अंग्लाईदेवी मंदिरापासून ते श्रीसमर्थ समाधी मंदिरा’पर्यंत ‘स्काय वॉक’ असणार आहे.