पणजी – आयुर्वेद आणि निसर्गाेपचार यांना प्रोत्साहन दिल्यास गोव्यातील पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होऊ शकते. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय युनानी मेडिसीन इन्स्टिट्यूट आणि देहली येथील राष्ट्रीय हॉमिओपॅथी इन्स्टिट्यूट यांमुळे देशभरात आयुष आरोग्यसेवेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. जगभरातील ३० देशांनी आयुर्वेदाला पारंपरिक औषधोपचार पद्धत या नात्याने मान्यता दिलेली आहे. आयुर्वेदाला आता जगन्मान्यता देण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कांपाल, पणजी येथे चालू असलेल्या ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शन याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘८ वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा आयुष अर्थव्यवस्था २० सहस्र कोटी रुपयांची होती आणि आता ती १ लाख ५० सहस्र कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. या क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते. आयुष क्षेत्रात भारतभरात ४० सहस्र ‘एम्.एस्.एम्.ई.’ (लघु आणि मोठे उद्योग) कार्यरत आहेत.’’
देशात लवकरच राष्ट्रीय आयुष संशोधन संघ कार्यन्वित होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘देशात लवकरच राष्ट्रीय आयुष संशोधन संघ कार्यान्वित होणार आहे. केंद्रशासनाने आयुषसंबंधी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पुरावे गोळा करून संशोधन पोर्टल चालू केले आहे. कोरोना महामारीच्या काळात आयुष विभागामध्ये १५० संशोधने करण्यात आली आहेत. आधुनिक विज्ञान हे माहितीच्या आधारावर उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवते आणि यामुळे आयुषसंबंधी उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे यांचा संग्रह करणे ही काळाची आवश्यकता आहे. यामुळे आयुष विभागाशी निगडित संशोधकांनी या विषयाची वैद्यकीय माहिती, संशोधन आणि ‘जर्नल्स’ संग्रहित करणे अत्यावश्यक आहे.’’
मोपा येथील विमानतळाद्वारे देशातील २० आणि जगातील १२ स्थळे जोडली जाणार आहेत. दाबोळी विमानतळाद्वारे देशातील १५ आणि जगातील ६ स्थळे जोडली गेली आहेत. दोन्ही मिळून गोव्याशी देशातील एकूण ३५, तर जगातील एकूण १८ स्थळे जोडली जाणार आहेत.
Addressing 9th World Ayurveda Congress in Goa. It is a noteworthy effort to further popularise India’s traditions. https://t.co/8f8lyuqY1f
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
गोव्यात स्वतंत्र आयुष खाते चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोवा राज्यात स्वतंत्र आयुष खाते चालू करण्यात येणार आहे आणि हे खाते आयुष वैद्यांसाठी समर्पित असेल. धारगळ, पेडणे येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत निम्म्या जागा गोमंतकियांसाठी आरक्षित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यानेच आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
धारगळ, पेडणे येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा विभागाच्या संचालिका डॉ. तनुजा नेसारी म्हणाल्या, ‘‘आयुर्वेद संस्थेतील पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि गोमंतकियांसाठी आरक्षित असलेल्या निम्म्या जागा भरल्या आहेत.’’