पुणे – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव १० ते १४ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांनी वतीने धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी, व्याख्यान, आरोग्य अन् रक्तदान शिबिर यांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. या वेळी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येईल. सोहळ्याचे यंदाचे हे ४६१ वे वर्ष आहे. या विषयीची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी ८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. १४ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजता संजीवन समाधीची महापूजा होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.