शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा निर्णय कागदावरच !

मुंबई – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश १ ऑक्टोबर या दिवशी काढला होता. हा शासन आदेश काढून १ मास होऊन गेला, तरी राज्यातील शासकीय कार्यालयांतच नव्हे, तर मंत्रालयातही या आदेशावर कार्यवाही होत नाही.

महाराष्ट्र शासनाने ‘वन्दे मातरम्’विषयीचा शासन आदेश काढण्यापूर्वी वन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आला; मात्र प्रशासनाने हा आदेश गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. मंत्रालयात वन आणि सांस्कृतिक कार्य विभागामध्ये कर्मचारी दूरभाषवर बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणत आहेत; मात्र मंत्रालयातील अन्य विभागांमध्ये अद्यापही दूरभाष किंवा दूरभाष यांवर बोलतांना ‘हॅलो’ असेच म्हटले जात आहे. त्यामुळे शासनाने हा अभिनंदनीय निर्णय घेतला असला, तरी त्यानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी जागृती करणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

या निर्णयाची तातडीने कार्यवाही होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत !