अध्यात्मातील अधिकारी असूनही सर्वांशी समरस होऊन सर्वांना आपलेसे करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

स्वतः आध्यात्मिक स्तरावर राहून इतरांनाही आध्यात्मिक स्तरावर जोडणे, हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वैशिष्ट्य !

‘साधेपणा हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची आणि सुंदर आचरणाची जोड आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात सर्वांना आनंद मिळतो. सप्तर्षींच्या आज्ञेने दैवी प्रवास करत असतांना अनेक समाजघटकांशी आमचा संबंध येतो. सर्व परिस्थितींत आपल्या सहज आणि सुंदर आचरणाने आनंदाची उधळण करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे आमच्यासाठी एक चालते-बोलते विद्यापीठच आहे ! स्वतः अध्यात्मातील उन्नत असूनही त्या त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांशी स्वतःहून जवळीक करतात. त्यांच्याशी समरस होतात. सर्वांवर त्यांच्या प्रीतीची उधळण करतात. असे काही निवडक प्रसंग येथे देत आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

अनोळखी व्यक्तींशी सहजतेने संवाद साधून त्यांच्याशी जवळीक करणे

अनोळखी महिलेशी संवाद साधून तिला बोलते करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.११.२०१६)
स्थानिक महिलांशी संवाद साधतांना श्रीचित्‌‌शक्ति आणि महिला यांच्या मुखावरील निखळ आनंद ! (१३.७.२०२१)

एका ठिकाणी आम्ही एका गावातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे जतन करण्यासाठी ध्वनीचित्रीकरण केले. ध्वनीचित्रीकरण झाल्यावर त्या ठिकाणी एक वयस्कर महिला बसली होती. त्या आजी श्रीचित्‌‌शक्ति काकूंकडे पहात होत्या; परंतु त्या डोक्यावर पदर घेऊन काकूंशी बोलायला लाजत होत्या. श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी त्यांना पाहिले आणि लगेच त्यांच्याजवळ जाऊन बसल्या. त्या आजींशी त्यांच्या संस्कृतीविषयी बोलू लागल्या. आरंभी त्या आजी इतक्या लाजत होत्या की, त्यांना काही बोलताच येत नव्हते. श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी त्यांना इतके आपलेसे केले की, त्या काही वेळातच खुलल्या आणि मोकळेपणाने बोलू लागल्या. श्रीचित्शक्ति काकूंची ती सहजता पाहून त्या पुष्कळच भारवून गेल्या; कारण त्यांना वाटले, ‘मी एक साधारण बाई असूनसुद्धा या माझ्याजवळ येऊन बसल्या’, माझ्याशी अगदी घरच्या व्यक्तीसारखे बोलू लागल्या. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति काकू त्यांना लगेच म्हणाल्या, ‘‘मी कुणी वेगळी नाही. मी तुमचीच आहे आणि तुमच्यासारखीच आहे.’’

तेव्हा लक्षात आले की, त्यांना सगळेच आपलेसे वाटतात आणि प्रत्येकासाठी काही ना काही करावेसे वाटते ! त्यामुळेच सप्तर्षींनी त्यांना ‘श्रीचित्‌‌शक्ति ’ म्हणून गौरवले आहे.

– श्री. स्नेहल मनोहर राऊत


भोजनालयातील आचारी महिलेच्या बाजूला बसून भाकरी करून पहाणे

आचारी महिलेकडून भाकरी कशी करतात ? ते जाणून घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.१२.२०२०)

डिसेंबर २०२० मध्ये आम्ही दैवी प्रवासानिमित्त राजस्थानातील ‘पुष्कर’ या ठिकाणी गेलो होतो. तेथे ‘पुष्कर’ तलावाचे दर्शन घेऊन झाल्यावर एका ठिकाणी भोजन करण्यासाठी थांबलो. ते पुष्कळच साधे आणि लहानसे भोजनालय होते. आम्ही बसलो होतो, तेथे बाजूलाच त्या भोजनालयाच्या महिला आचारी चुलीवर भाकरी बनवत होत्या. हे श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी पाहिले. त्या लगेच उठल्या आणि कोणताही विचार न करता भाकरी बनवणार्‍या त्या महिलेच्या अगदी बाजूला जाऊन बसल्या आणि ‘त्या भाकरी कशी बनवत आहेत ?’, ते जिज्ञासूपणे पाहू लागल्या. श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी त्या महिलेला विनंती केली की, ‘मीपण एक भाकरी करून पाहू का ?’ असे म्हणून त्यांनी भाकरी करण्यास घेतलीसुद्धा ! ते पाहून त्या बाई अचंबित झाल्या; कारण ‘भोजनालयांमध्ये भोजन करण्यास अनेक जण येतात; पण इतक्या आपुलकीने अगदी त्यांच्या बाजूला बसून भाकरी करून पहाणार्‍या या एकमेव आहेत’, असे त्यांना वाटले. अवघ्या ५ मिनिटांत ‘ते भोजनालयवाले जणू आपले घरचेच आहेत कि काय’, असे त्या दोघींचे बोलणे चालू झाले.

मी त्यांच्या जागी असतो, तर केवळ जाऊन पाहिले असते; पण लहानशा भोजनालयातील आचार्‍याच्या बाजूला बसून ते शिकण्याची सिद्धता दर्शवली नसती. गुरूंमध्ये अहं नसल्याने आणि प्रत्येक गोष्ट देवाने घडवली असल्याने ती आनंदाने शिकण्याची ओढ आणि सर्वांप्रती प्रीती असते !

– श्री. स्नेहल मनोहर राऊत


साधकांना आनंद देण्यासाठी अखंड कार्यरत रहाणे

प्रवासातून दमून आल्यानंतरही वाढदिवस असलेल्या साधकांच्या ताटाभोवती स्वतः रांगोळी काढणे : एकदा आम्ही लांबचा प्रवास करून बेंगळुरू येथे पोचलो. त्या दिवशी आमच्या समवेत सेवा करणार्‍या एका साधकाचा वाढदिवस होता आणि एकाचा वाढदिवस आदल्या दिवशी झाला होता. श्रीचित्‌‌शक्ति काकूंना याविषयी कळताच त्यांनी बेंगळुरू येथे पोचल्या पोचल्या लगेच सहसाधकांना गोड खाऊ आणण्यास सांगितले आणि स्वतः लगेच २ आसने घालून त्या साधकांच्या भोजनाच्या ताटाभोवती रांगोळी काढू लागल्या. त्या दिवशी पुष्कळ प्रवास झाला होता आणि आम्ही सर्वच साधक थकलो होतो. श्रीचित्‌‌शक्ति काकू पण नक्कीच थकल्या असणार; पण तरीही त्या सर्व कृती उत्साहाने करत होत्या. तेव्हा आम्ही त्यांना प्रार्थना केली, ‘‘काकू, हे सगळे नको करायला. आताच प्रवासातून दमून आला आहात.’’

तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी सांगितले, ‘‘प्रवास तर नेहमीच असतो. आज साधकांचा वाढदिवस आहे. तो वर्षातून एकदाच असतो. तो आनंद त्यांना नको का द्यायला ?’’ असे सांगून त्यांनी त्या साधकांच्या ताटांभोवती छान रांगोळी काढली आणि त्या दोन्ही साधकांचे औक्षणही केले.

आपण केवळ शुभेच्छा देऊन मोकळे झालो असतो; पण ‘त्या श्रीचित्‌‌शक्ति काकू का आहेत ?’, हे त्यांनी कृतीतून शिकवले. त्यातही इतकी सहजता असते की, त्याचे शब्दांत वर्णन करणे कठीणच आहे. श्रीचित्‌‌शक्ति काकूंच्या समवेत काही क्षण असे असतात, जे केवळ अनुभवायचे असतात आणि त्यातील अमर्याद आनंद घेत रहायचा असतो !

– श्री. स्नेहल मनोहर राऊत


अनोळखी गावामध्ये जाऊन तेथील प्रत्येकाला आपलेसे करणे

हातमागावर साडी कशी विणतात ? हे स्वत: करून पहातांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२५.१०.२०१८)

‘आरणी’ हे गाव चेन्नईपासून २.३० घंटे अंतरावर आहे. या ठिकाणी रेशमी साड्या सिद्ध करण्याचा मोठा व्यवसाय आहे. या गावांत घरोघरी रेशमी धाग्यांना रंग देण्यापासून ते पूर्ण साडी तयार होईपर्यंतची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आम्ही त्या गावी एका ठिकाणी गाडी उभी केली आणि पूर्ण गावात पायी फिरलो. घराघरांत जाऊन त्या त्या टप्प्याचे कार्य कसे चालते ?, याचे ध्वनीचित्रीकरण करून त्यातील माहीतगार व्यक्तींची मुलाखत घेतली. त्या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्यातीलच एक होऊन श्रीचित्‌‌शक्ति काकू सर्वत्र पायी फिरल्या. ‘ते कसे हातमाग चालवतात ?’, ‘छोट्याशा जागी बसून साडी कशी सिद्ध करतात ?’, हे श्रीचित्‌‌शक्ति काकूंनी स्वतः त्या त्या ठिकाणी बसून प्रत्यक्ष करून पाहिले.

श्री. स्नेहल मनोहर राऊत

आम्ही सकाळी ८ वाजता त्या गावी पोचलो होतो. सर्वत्र फिरून माहिती गोळा करेपर्यंत रात्रीचे ८.३० कधी झाले आम्हाला कळलेच नाही ! शेवटी निघतांना गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती त्या ठिकाणी गोळा झाल्या आणि त्यांनी पुष्कळ आपलेपणाने आम्हाला निरोप दिला. ते सर्व जण ‘घरातीलच आपली व्यक्ती चालली आहे’, या प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते. सर्वांनी श्रीचित्‌‌शक्ति काकूंना प्रार्थनाही केली, ‘‘तुम्ही पुन: पुन्हा या. तुमच्या सहवासात आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला !’’

एका दिवसात हे प्रेम सामान्य व्यक्तीला सहज मिळत नाही. अनोळखी व्यक्तींकडून आपलेपणा मिळण्यासाठी स्वतःचा अहं, प्रतिमा आणि देहभान विसरावे लागते, तसेच ‘आपण इतरांपेक्षा वेगळे नाही’, याची जाणीवही असली पाहिजे. स्वतःमध्ये सर्वांप्रती उच्च प्रीती हवी. हे केवळ ‘अध्यात्मात ज्यांनी खरोखरच प्रगती केली आहे’, असे सद्गुरुच करू शकतात’, याची मला प्रत्यक्ष प्रचीती आली.

– श्री. स्नेहल मनोहर राऊत


साधकांच्या घरी येणार्‍या कामगारांनाही प्रेम देऊन सहजतेने आपलेसे करणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू साधकांच्या घरी कामाला येणार्‍या कामगारांचीही चौकशी करतात. त्या पुष्कळ प्रेमाने त्यांची ‘जेवण झाले का ? घरचे सर्व कसे आहेत ?’, अशी विचारपूस करतात. त्यामुळे ते कामगार आम्ही निघतांना म्हणतात, ‘‘लवकर या. आम्हाला तुमची सेवा करायला आवडते आणि छान वाटते.’’ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणतात, ‘‘आयुष्यात असेच प्रेम मिळवायचे असते. असाच आनंद आणि प्रेम देत गेलात की, तो आपोआप ईश्वराशी जोडला जातो.’’ – श्री. वाल्मिक भुकन

आम्ही आतापर्यंत अनेक संप्रदाय आणि संस्था पाहिल्या; पण सनातन संस्थेसारखे कुठे पाहिले नाही. अन्य संप्रदायांमध्ये संघटनेतील पद मिळाल्यावर त्यांचे वागणे-बोलणे बदलल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांना कुणाशी बोलायलाही वेळ नसतो. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की, देवाने आमच्या जीवनात ३ महान गुरु दिले. त्याविषयी मी कोटीशः कृतज्ञ आहे !’

– श्री. स्नेहल मनोहर राऊत, (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), गोवा. (१६.११.२०२२)