गणेश नाईक ट्रस्टची एस्.एस्.सी. सराव परीक्षा महाराष्ट्रासाठी एक आदर्श – राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) –  ‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने घेण्यात येणारी एस्.एस्.सी. सराव परीक्षा ही महाराष्ट्रासाठी एक आदर्श असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नेरुळ येथे केले.

‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने एस्.एस्.सी. बोर्डाच्या धर्तीवर ३ ते १८ डिसेंबर या कालावधीत ही सराव परीक्षा शहरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी भाजपचे आमदार गणेश नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती नाहीशी करून मुख्य परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे अन् उत्तम यश संपादित करावे, हा या परिक्षेचा उद्देश आहे. अद्यापपर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना महापालिका अथवा खासगी शाळांमधून शिक्षण घेण्यास सहकार्य करणार असल्याचे नाईक यांनी या वेळी सांगितले.

संस्थेचे सचिव माजी आमदार संदीप नाईक यांनी प्रतीवर्षी १० सहस्रांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसत असल्याचे सांगितले. या वर्षी ७२ शाळा यात सहभागी झाल्या आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून सर्व विषयांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे. तसेच विद्यार्थ्यांचे गुण वाढवणारे ‘स्पीड रिव्हिजन ॲप’चे विनामूल्य वितरण करण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, वेळेचे नियोजन कसे करावे, करिअर मार्गदर्शन अशी उपयुक्त माहिती आहे, असे संदीप नाईक यांनी सांगितले.