नाशिक येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमास टाळे, मुलींची शासकीय निवारागृहात रवानगी !

६ आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण

ज्ञानदीप गुरुकुल आश्रम

नाशिक – येथील म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील १३ मुलींपैकी ६ आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर आश्रमास टाळे ठोकण्यात आले आहे. संबंधित मुलींना शहरातील शासकीय निवारागृहात हलवण्यात आले आहे.  मुलींवर अत्याचार करणारा वसतीगृह संचालक हर्षल मोरे यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे.

वर्ष २०१८ मध्ये वसतीगृह चालू केल्यापासून संशयित मोरे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. (असे आहे, तर तेव्हाच त्याच्यावर कारवाई का झाली नाही ? – संपादक) काही मुलींवर एकापेक्षा अधिक वेळा लैंगिक अत्याचार झाले आणि त्यापैकी एका मुलीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्याचार झाले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर यांनीही पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाचे गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

संपादकीय भुमिका

गरीब आदिवासी मुलींवर अत्याचार करणे ही गंभीर गोष्ट असल्याने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे योग्य ठरेल !