राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांच्या अन्वेषणासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

उदय सामंत

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले उद्योग कोणत्या कारणांमुळे गेले याचे अन्वेषण करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी उदय सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत त्याविषयी ६ मासांत श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांचे आरोप राजकीय आहेत. महाराष्ट्राचे वातावरण उद्योगांसाठी अनुकूल आहे. राजकीय आरोपांमुळे राज्यातील वातावरण दूषित होऊ शकते. १४ जुलै २०२० या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेदांता फॉसकॉन’ आस्थापनाला महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी पत्र पाठवले होते. ‘शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हा प्रकल्प गुजरातला पाठवला’, या आरोपात तथ्य नाही. मूळात महाविकास आघाडीच्या काळात ‘वेदांता फॉसकॉन’ आस्थापनाशी सामंजस्य करार झाला नव्हता. येत्या काळात महाराष्ट्रात ५० सहस्र कोटी रुपयांचे विविध प्रकल्प आणण्यात येतील आणि त्यांचे सामंजस्य करारही करण्यात येतील. सिनारमस आस्थापनाला पहिल्या टप्प्यासाठी सरकारकडून ३०० हेक्टर भूमी देण्यात आली आहे. पुढच्या टप्प्यात या प्रकल्पाला आणखी ३०० हेक्टर भूमी देण्यात येईल. एकूण २० सहस्र कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून एकूण ७ सहस्र नोकर्‍या मिळतील.’’