छत्रपती शिवरायांचा अद्वितीय पराक्रम !

‘मार्गशीर्ष शुक्ल ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूर येथून आदिलशाहच्या दरबारातून त्यांना पकडण्यास आलेल्या अफझलखानाचा वध केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढता प्रताप पाहून आदिलशाहच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाविषयी भीती निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य कपटाने करण्याचे आदिलशाहने ठरवले. आदिलशाहच्या दरबारातील अफझलखान याने प्रतिज्ञा केली, ‘या डोंगरातील उंदरास (छत्रपती शिवाजी महाराज यांना) जिवंत अगर मेलेला पकडून मी येथे आणून रुजू करतो.’ त्याने मोठी फौज घेऊन पुण्याकडे प्रयाण केले. पंढरपूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, शंभूमहादेव या गावांवरून त्याची स्वारी येत असता त्याने अनेक हिंदु देवस्थाने उद्ध्वस्त केली. त्याने पंढरपूरच्या विठोबाची विटंबना केली. पुढे महाराजांची तुळजापूरची कुलदेवता श्री भवानीदेवीची मूर्ती फोडली. या उच्छादामुळे लोकांची मने प्रक्षुब्ध झाली.

प्रतापगड

प्रतापगडी छत्रपती शिवरायांची सिद्धता होतीच. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी मंडप सज्ज होऊ लागला. अफझलखानाच्या भेटीचा मार्गशीर्ष शुक्ल  ७ हा दिवस ठरला. शिवाजी राजांनी अंगात चिलखत घातले. डोक्यावर शिरस्त्राण चढवले. उजव्या हातात भवानी तलवार, डाव्या हातात वाघनखे, अशी सिद्धता करून घेतली. श्री भवानीदेवी आणि मातोश्री जिजाबाई यांचा आशीर्वाद घेऊन महाराज निघाले.

भेटीचे वेळी प्रथम अलिंगन देतांना खानाने शिवाजी राजांस आपल्या डाव्या बगलेत आवळून धरले आणि पोटात जमदाड (एक शस्त्र) चालवले. वेळ कठीण आहे, हे पाहून शिवरायांनी डाव्या हाताची वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याबरोबर ‘दगा रे दगा’, असे ओरडून खानाने शिवाजी राजांच्या डोक्यावर वार केला. शिरस्त्राण असल्यामुळे फारशी इजा झाली नाही. शिवाजी राजांनी आपल्या तलवारीचा वार खानाच्या खांद्यावर करून त्यास पोटापर्यंत चिरले. त्याबरोबर खान गतप्राण होऊन भूमीवर पडला.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)