शौर्य आणि भक्ती यांच्यामुळे झालेला पराक्रम म्हणजे अफझलखानाचा वध !

आज ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘शिवप्रतापदिन (अफझलखानवध दिन)’ आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला आणि त्यांनी ‘आतंकवाद कसा संपवायचा असतो ?’, याचे प्रत्यक्ष प्रमाण कृतीतून दाखवून दिले. हे धाडसी कृत्य करणे खरेच एवढे सोपे होते का ? अफझलखानचा पूर्वेतिहास पहाता महाराजांना त्याचा वध करणे, हे खरेच सहज शक्य होते का ? महाराजांना कुठून मिळाली असेल एवढी शक्ती आणि ऊर्जा ? फक्त शारीरिक शक्तीच्या जोरावर महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला का ?  तर या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘नाही’, असे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जी शक्ती होती, ती म्हणजे त्यांची भक्ती !

श्री भवानीमातेचे हृदयात अखंड स्मरण आणि दोन संतांचे आशीर्वाद अन् त्यांची भक्ती हीच छत्रपती शिवाजी महाराजांची खरी शक्ती होती. आजपर्यंत आपण शिवप्रतापदिन फक्त शौर्याच्या दृष्टीने पहात होतो; पण आज आपण भक्तीयुक्त शौर्य काय असते, ते जाणून घेऊया.

श्री. हर्षद खानविलकर

१. छत्रपती शिवरायांच्या मनात अफझलखानवधाचा विचार आई भवानीमातेच्या संकल्पामुळे येणे

अफझलखानाने आई भवानीमातेची मूर्ती फोडली होती. त्याचे वर्णन करतांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्रात म्हटले आहे, ‘अफझलखान हा तेव्हाच ५० टक्के संपला होता.’ आध्यात्मिकदृष्ट्या स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते. कोणत्याही कृतीपूर्वी प्रथम संकल्प होतो आणि मग कृती होते. याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रसंगात येतो. आई भवानीमातेनेच तो संकल्प महाराजांच्या मनात निर्माण केला होता. जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की, मी सर्वांना पहिलेच मारले आहे, तू फक्त निमित्तमात्र आहे.

२. छत्रपती शिवरायांनी केलेला पराक्रम ईश्वरी नियोजनानुसारच !

अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते. युद्धामध्ये चिलखत नेहमी पुढे घातले जाते; पण महाराजांनी पाठीवर चिलखत घातले होते. डोक्यावर जिरेटोप घातला होता. भेटीला कुठलेही शस्त्र घेऊन जायचे नसतांना बिचवा (चाकूसारखे एक शस्त्र) आणि वाघनखे घेऊन गेले. छत्रपती शिवरायांनी अशा प्रकारे केलेली ही सर्व सिद्धता म्हणजे आई भवानीची कृपाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष वधाच्या दिवशी आई भवानीमातेची उपासना म्हणजेच तिचा नामजप केला होता. येथे महाराजांचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात येते.

३. अफाट सैन्यक्षमता आणि शक्ती असतांना अफझलखानाला दुर्बुद्धी होणे ही भवानीमातेची कृपाच !

अफझलखानाचे स्वतःचे २० सहस्र जणांचे सैन्य असतांना त्याला काही निवडक सैनिकांसह छत्रपती शिवरायांना भेटण्याची दुर्बुद्धी होणे, ही आई भवानीमातेची कृपाच आहे ! प्रत्यक्षात जेव्हा भेट झाली तेव्हा खानाने दगा दिला. गळाभेटीच्या नावाने त्याने महाराजांची मान दाबून पाठीत वार केला आणि खानाचा वार फुकट गेला. येथे लक्षात येते की, अफझलखानाला पाठीत वार करायची बुद्धी कशी काय झाली ? जो व्यक्ती त्या काळातील तोफ एकट्याने खेचण्याची क्षमता ठेवत होता, त्याने पाठीत वार करावा ? स्वतःच्या ६३ बायकांना आणि अनेक जणांना ज्याने क्रूरतेने मारले त्याने पाठीत वार करावा ? हे आई भवानीमातेचे नियोजन नाही का ?

४. अफझलखानाच्या वधामुळे छत्रपती शिवरायांच्या शौर्यासह भक्तीची श्रेष्ठता लक्षात येणे

आई भवानीच्या कृपेने महाराजांनी पाठीवर चिलखत घातल्याने त्यांचे रक्षण झाले आणि तीच संधी साधून त्यांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. या संपूर्ण प्रसंगात महाराजांच्या शौर्यासह त्यांची भक्ती किती श्रेष्ठ होती ? आणि ती या प्रसंगात कशी उपयोगाला आली ? हे आपल्याला लक्षात येते.

 ५. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शक्तीला भक्तीची जोड देणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराजांचे वर उल्लेखलेले आध्यात्मिक शौर्य वाचून आपणही आजच्या शिवप्रतापदिनी प्रण करूया, ‘ज्याप्रमाणे महाराजांनी श्री भवानीदेवीची उपासना केली, त्याप्रमाणे स्वतःतील आध्यात्मिक शौर्य वाढवण्यासाठी आपणही आपल्या कुलदेवतेचा नामजप नियमित करूया. शक्तीला भक्तीची जोड देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध होऊया.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (डिसेंबर २०२१)